अमरावती (आंध्र प्रदेश):जर कोणाला नक्षलवादी व्हायचे असेल, तर ते होऊ शकतात. त्यासाठी राष्ट्रपतींच्या परवानगीची गरज नाही, असे खळबळजनक वक्तव्य आंध्र प्रदेशचे समाजकल्याण मंत्री पिनिपे स्वरुप यांनी केले आहे.
आंध्रच्या पूर्व गोदावरी जिल्ह्यात एका दलित तरुणाला पोलिसांकडून मारहाण करण्यात आली होती. त्यानंतर त्याने राष्ट्रपतींनी पत्र लिहून, आपल्याला नक्षलवादी संघटनांमध्ये सामील होण्याची परवानगी द्यावी अशी विनंती केली होती. त्यावर प्रतिक्रिया देत स्वरुप यांनी हे विधान केले.
दरम्यान, मिळालेल्या माहितीनुसार राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी तातडीने या पत्राची दखल घेत, या प्रकरणाचा तपास करण्यासाठी एका विशेष अधिकाऱ्याची नियुक्ती केली होती.
काय केलं होत युवकाने?
मिळालेल्या माहितीनुसार, वरा प्रसाद या तरुणाने वायएसआरसीपी पक्षाच्या नेत्याद्वारे सुरु असलेली वाळूची वाहतूक रोखली होती. त्यानंतर पोलिसांनी त्याला चौकशीसाठी बोलाविले होते. मुनी कोडालाई येथे ही घटना घडली होती. वरा प्रसार हा विडूल्लापल्ले गावातील रहिवासी असून सितानगरम पोलीस ठाण्यात त्याला २० जुलैला चौकशीसाठी बोलविण्यात आले होते. मात्र, त्याने पोलिसांनी माराहाण केल्याचा आरोप केला होता. त्यानंतर त्याने राष्ट्रपतींना पत्र लिहले होते.
या प्रकरणी सितानगरम पोलीस ठाण्याचे उपनिरिक्षक आणि कर्मचाऱ्यांना अटक करण्यात आली असून त्यांना पोलीस कोठडी देण्यात आली आहे. अनूसुचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यांतर्गत त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.