नवी दिल्ली - ईशान्य दिल्लीत झालेल्या हिंसाचाराच्याविरोधात जवाहरलाल नेहरू विद्यापीठातील विद्यार्थी संघटना आणि जामिया मिलिया इस्लामिया विद्यापीठाच्या माजी विद्यार्थ्यांनी मुख्यमंत्री निवासस्थानाला घेराव घातला. मंगळवारी रात्री विद्यार्थ्यांनी केंद्र सरकार, दिल्ली सरकार आणि मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. विद्यार्थ्यांच्या जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांना पाण्याचा मारा करावा लागला.
मुख्यमंत्री केजरीवाल यांनी हिंसाचारग्रस्त भागाची स्वत: पाहणी करुन परिस्थितीचा आढावा घ्यावा. दिल्लीत शांतता आणि सुव्यवस्था प्रस्थापित करण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना कराव्यात. हिंसाचारात जखमी आणि मृत झालेल्या लोकांच्या मदतीसाठी सर्व सरकारी यंत्रणा पूर्णपणे सक्रिय कराव्यात, अशी मागणी जेएनयूतील विद्यार्थी संघटनेच्या माजी उपाध्यक्ष सारिका चौधरी यांनी या आंदोलना दरम्यान केली.