कुपवाडा - बाबागुंड, हंदवाडा येथे सुरक्षा दले आणि दहशतवाद्यांदरम्यान झालेल्या चकमकीत २ सीआरपीएफ जवान आणि २ पोलिसांना वीरमरण आले. सलग तिसऱ्या दिवशी येथे चकमक सुरू आहे. या चकमकीत एक नागरिकही ठार झाला आहे.
वीरमरण आलेल्यांपैकी नासीर अहमद कोहली, गुलाम मुस्ताफा बराह अशी पोलिसांची नावे असून पिंटू आणि विनोद अशी सीआरपीएफ जवानांची नावे आहेत. वसीम अहमद मीर असे मृत नागरिकाचे नाव आहे.
करालगुंड , हंदवाडा येथील बाबागुंड परिसरात दहशतवादी लपलेले असल्याची माहिती मिळाल्याने शुक्रवारी शोध मोहीमेस सुरुवात करण्यात आली होती. पोलीस आणि सुरक्षा दलांनी संयुक्तपणे ही कारवाई केली होती.
कारवाईच्या पार्श्वभूमीवर येथील नागरिकांना चकमक सुरू असलेल्या भागात न फिरण्याचे आवाहन केले आहेत. या परिसरात अनेक स्फोटके धोकादायकरीता पसरलेली आहेत. येथील लोकांना सुरक्षित जागी हलवण्यात आले असून परिसर स्फोटकेविरहित होईपर्यंत पोलिसांना सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे.
केंद्र सरकारने राज्यातील संवेदनशील ठिकाणी आणखी बंकर बांधण्यास मंजुरी दिली आहे. पूंच आणि राजोरी जिल्ह्यांमध्ये प्रत्येकी २०० अतिरिक्त बंकर्ससह ४०० बंकर्स बांधण्यास मंजुरी दिली आहे.