श्रीनगर - जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांच्यासह मेहबूबा मुफ्ती यांना अटक करण्यात आली आहे. मेहबूबा मुफ्ती यांना शासकीय विश्रामगृहात हलवण्यात आले आहे. राज्यात कायदा व सुव्यवस्था कायम राहण्यासाठी ही कारवाई करण्यात आली आहे.
जम्मू काश्मीरमध्ये लागू असलेले कलम 370 रद्द करण्यात आले आहे. राज्यसभेत ते मंजूर झाले आहे. गृहमंत्री अमित शाह यांनी हे विधेयक दोन्ही सभागृहात मांडले होते. विधेयक मंजूर झाल्यानंतर लगेचच ही कारवाई करण्यात आली आहे. यापूर्वी रविवारी मुफ्ती आणि ओमर अब्दुला यांना स्थानबद्ध करण्यात आले होते. पीपल्स कॉन्फरन्सचे नेते सज्जाद लोन आणि इम्रान अन्सारी यांनाही अटक करण्यात आली आहे. या नेत्यांना किती काळ कोठडीत ठेवण्यात येईल, याबाबतची कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही.