बारामुल्ला -उत्तर काश्मीरच्या बारामुल्ला जिल्ह्यातील सोपोरमध्ये बुधवारी झालेल्या चकमकीत लष्कर-ए-तैयबाचा प्रमुख दहशतवादी ठार करण्यात आला. जवानांना दहशतवादी या ठिकाणी लपल्याची माहिती मिळाली होती. सेनेच्या २२- राष्ट्रीय रायफल्स, सीआरपीएफ आणि पोलिसांच्या विशेष कारवाई दलाच्या जवानांनी संयुक्तरीत्या ही मोहीम राबवली.
हेही वाचा -लेह-कारगिलसह राज्यातील जिल्ह्याची स्थिती सामान्य, डीजीपी दिलबाग सिंह यांची माहिती
जवानांनी दहशतवादी लपलेल्या परिसरास वेढा देऊन शोध मोहीम सुरू केल्यानंतर, दहशतवाद्याकडून जवानांवर गोळीबार करण्यात आला. जवानांनी दिलेल्या प्रत्त्युत्तरात लष्कर-ए-तैयबाच्या प्रमुख कमांडर्समधील दहशतवादी आसिफचा खात्मा झाला. यावेळी जवानांनी त्याच्याजवळील हत्यारांसह काही दारूगोळा देखील जप्त केला. या चकमकीत दोन जवान जखमी झाले आहेत.
हेही वाचा - महिला पोलीस अधीक्षकाने अपघातग्रस्ताला स्वत:च्या गाडीतून रुग्णालयात केले दाखल
जम्मू-काश्मीरचे डीजीपी दिलबाग सिंह यांनी या कारवाईविषयी माहिती दिली. 'दहशतवादी आसिफ हा सोपोर परिसरात अनेक दिवसांपासून सक्रिय होता. मागील महिन्यात या परिसरात घडलेल्या दहशतवादी कारावायांमध्ये त्याचा सहभाग होता. त्याने ठिकठिकाणी पोस्टर लावून काश्मीर खोऱ्यातील लोकांना दुकाने आणि व्यवसाय बंद ठेवण्यासाठी धमकावलेही होते,' असे सिंह यांनी सांगितले.