बोकारो - झारखंडमधील बोकारो जिल्ह्यात सीआरपीएफ जवानांनी आपापसांत झालेल्या वादातून एकमेकांवरच गोळ्या झाडल्याचा गंभीर प्रकार घडला आहे. यात चार जवान गंभीर जखमी झाले आहेत. तर, २ जवानांचा मृत्यू झाल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. प्रकरणाची चौकशी सुरू असून याविषयी पोलिसांकडून अधिक माहिती मिळू शकली नाही. तसेच, जवानांच्या मृत्यूविषयीही मौन बाळगण्यात येत आहे.
याआधी ITBP जवानांनी एकमेकांवर केलेल्या गोळीबारात ६ जवानांनाचा मृत्यू झाला होता. ही घटना ताजी असतानाच एका आठवड्यात ही दुसरी घटना घडली आहे. या घटनांमुळे देशातील विविध सुरक्षा दलांना हादरा बसला आहे.
सीआरपीएफ जवानांनी एकमेकांवरच झाडल्या गोळ्या; दोघांचा मृत्यू - सूत्र बोकारो जिल्ह्यातील गोमिया चतरो चट्टी पोलीस ठाणे परिसरात ही घटना घडली. आपापसांत झालेल्या वादावादीतून गोळाबार होऊन २ जवानांना प्राण गमवावे लागल्याचे समजले आहे. पोलीस उपअधीक्षक साहुल हसन आणि सहाय्यक उपनिरीक्षक पी भुंइया अशी त्यांची नावे आहेत. त्यांचा जागीच मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे. तर, चार जवान गंभीर जखमी झाले. त्यापैकी दोघांना उपचारांसाठी हेलिकॉप्टरने रांची येथे आणण्यात आले. तर, इतर दोघांना बोकारो येथील बीजीएच रुग्णालायात दाखल करण्यात आले.
जखमींपैकी हरिश्चंद्र गोकाई आणि दीपेंद्र यादव अशी दोघांची नावे असल्याचे समजले आहे. या घटनेनंतर बेरमो येथील उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखाली या घटनेची चौकशी सुरू आहे. मात्र, या प्रकरणाविषयी पोलिसांकडून अधिक माहिती देण्यास नकार देण्यात आला. त्यांनी जवानांच्या मृत्यूविषयीही मौन बाळगले आहे.