नवी दिल्ली - बिहार विधानसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्यानंतर राजकीय पक्ष तयारीला लागले आहेत. भाजपा-जेडीयू आघाडी आणि महागठबंधनमध्ये चुरशीची लढत पहायला मिळणार आहे. 'जनता दल युनायटेड (जेडीयू) निवडणुकीसाठी पूर्णपणे तयार आहे. राष्ट्रीय लोकशाही आघाडी (एनडीए) पुन्हा बहुमताने सरकार स्थापन करेल', असा विश्वास जनता दल युनायटेडचे राष्ट्रीय सचिव के. सी त्यागी यांनी व्यक्त केला आहे.
त्यागी यांनी ईटीव्ही भारतशी बिहार निवडणुकासंबंधी खास चर्चा केली. यावेळी ते म्हणाले, निवडणुकीच्या तारखा जाहीर होण्याची कार्यकर्ते वाट पाहत होते. नितीश कुमार यांनी १५ वर्षांच्या मुख्यमंत्रीपदाच्या कार्यकाळात केलेली विकासकामे आणि आरजेडी पक्षाचे प्रमुख लालू प्रसाद यादव यांनी १५ वर्षांच्या मुख्यमंत्रीपदाच्या कार्यकाळात केलेल्या कामाची तुलना हा या निवडणुकीचा मुख्य मुद्दा असणार आहे. लालू प्रसाद यादव यांच्या काळातील सरकारी गोंधळ नागरिक अजूनही विसरले नाहीत. बिहारचा विकास करण्यासाठी नितिश कुमार यांनी कठोर परिश्रम केल्याचे त्यागी म्हणाले.