नवी दिल्ली - फैज अहमद फैज, यांची "हम भी देखेंगे' कविता हिंदू विरोधी आहे की नाही, हे तपासण्यासाठी भारतीय तंत्रज्ञान संस्थेने विशेष समिती गठीत केली आहे. फैज यांना हिंदू विरोधी म्हणणे हास्यास्पद आणि विचित्र आहे, असे ज्येष्ठ कवी, गीतकार जावेद अख्तर यांनी म्हटलं.
फैज यांनी आपले निम्मे आयुष्य पाकिस्तानच्या बाहेर व्यतीत केले आहे. तेथे त्यांना पाकिस्तानी द्रोही म्हटले जायचे. पाकिस्तानमधील लष्करी राजवटीविरूद्ध त्यांनी ही कविता लिहिली होती. त्यामुळे फैज यांना हिंदू विरोधी म्हणणे हास्यास्पद आणि विचित्र असून गोष्टीवर गांभीर्याने बोलणे देखील कठीण असल्याचे जावेद अख्तर म्हणाले.
भारतीय तंत्रज्ञान संस्था कानपूरमध्ये (आयआयटी) नागरिकत्व सुधारणा कायद्याविरोधातील आंदोलनामध्ये विद्यार्थांनी फैज अहमद फैज, यांची 'हम देखेंगे लाजिम है, हम भी देखेंगे' कविता म्हटली होती. त्यावरून वाद निर्माण झाला असून ही कविता हिंदू विरोधी असल्याचे म्हटले जात आहे. संबधित कविता हिंदू विरोधी आहे का हे तपासण्यासाठी भारतीय तंत्रज्ञान संस्थेने विशेष समिती गठीत केली आहे.
आयआयटी कानपूर येथील विद्यार्थांनी जामिया मिलिया इस्लामिया विद्यापीठातील विद्यार्थांच्या समर्थनार्थ 17 डिंसेबरला मार्च काढला होता. यावेळी विद्यार्थांनी फैज अहमद फैज यांची 'हम देखेंगे लाजिम है, हम भी देखेंगे' कविता म्हटली होती. त्यावर कांत मिश्रा यांच्यासह 16 ते 17 जणांनी भारतीय तंत्रज्ञान संस्थाच्या संचालकांकडे लिखित तक्रार दाखल केली होती. संबधित कवितेमध्ये हिंदू विरोधी काही शब्द असल्याचे त्यांनी म्हटले होते, अशी माहिती भारतीय तंत्रज्ञान संस्थचे उपसंचालक मनिंद्र अग्रवाल यांनी दिली आहे.
ही कविता फैज यांनी 1979 मध्ये लष्करी हुकूमशहा झिया-उल-हक यांच्या संदर्भात आणि पाकिस्तानमधील लष्करी राजवटीविरूद्ध लिहिली होती. फैज क्रांतिकारक कल्पनांमुळे परिचित होते. याच कारणास्तव ते बरीच वर्षे तुरूंगात होते.
फैज अहमद फैज एक पाकिस्तानी कवी होते. लष्कर, तुरुंग व निर्वासनेत जीवन व्यतीत करताना फैझ ह्यांनी बऱ्याच उर्दू नज्म व गझल लिहिल्या. तसेच उर्दू शायरीमध्ये आधुनिक प्रगतिवादी (पुरोगामी) काळाच्या रचना घडवल्या. त्यांना नोबेल पारितोषिकासाठी पण नामांकित करण्यात आले होते.