नवी दिल्ली -पूर्व लडाखमधील भारत- चीन सीमावादावर जपानने भारताला पाठिंबा दिला आहे. सीमेवर एकतर्फी बदल करण्याच्या चीनच्या कृतीचा जपानच्या भारतातील राजदुताने विरोध दर्शवला आहे. 15 जूनला गलवान खोऱ्यात चीनी आणि भारतीय लष्करात धुमश्चक्री झाली. यामध्ये 20 भारतीय जवान शहीद झाले. तेव्हापासून सीमेवर तणाव निर्माण झाला असून परिस्थिती निवळलेली नाही.
भारताचे परराष्ट्र सचिव हर्ष वर्धन श्रिंगला आणि जपानचे राजदुत सतोशी सुझुकी यांच्यात बैठक झाली. दोन्ही देशांनी शांततापूर्ण मार्गाने वाद सोडवावा, अशी आशाही सुझुकी यांनी व्यक्त केली.
'परराष्ट्र सचिव श्रिंगला यांच्याशी चांगली चर्चा झाली. नियंत्रण रेषेवरील परिस्थितीची त्यांनी माहिती दिल्याबद्दल त्यांचे आभार. शांततापूर्ण मार्गाने वाद सोडविण्याची भारताची नीती आहे. चर्चेद्वारे हा प्रश्न सोडविला जावा ही जपानची आशा असून सीमेवर एकतर्फी बदल करण्याच्या कृतीला जपानचा विरोध आहे, असे ट्विट चर्चेनंतर जपानचे राजदुत सुझुकी यांनी केले आहे.
जपानही चीनच्या आक्रमक धोरणाने त्रस्त
पॅसिफिक महासागरात चीनच्या आक्रमक धोरणाने जपानही त्रस्त आहे. या महासागरातील स्येनकाकू या लहान बेटांच्या समुहावरून जपान आणि चीनचा वाद सुरु आहे. चीनने आंतरराष्ट्रीय नियमांचे उल्लंघन करत तेथे लष्करी कारवाया केल्या आहेत. त्यामुळे चीनबरोबरच्या वादात जपानचा भारताला पाठिंबा मिळत आहे. आशिया खंडात चीनला शह देण्यासाठी सर्वदेश भारताकडे पाहत आहेत.
आशिया खंडामध्ये चीनच्या आक्रमक नीतीला रोखण्यात जपान महत्त्वाचा देश आहे. चीनकडून संपूर्ण दक्षिण चिनी समुद्रावर दावा सांगण्यात येत आहे. मात्र, फिलिपिन्स, जपान, व्हिएतनाम आणि इतर शेजारी देशांकडून चीनच्या या कृतीला विरोध आहे. अनेक लहान बेटांवर मातीचा भराव टाकून प्रदेश हडपण्याचे प्रयत्न चीनकडून सुरु आहे. तसेच संपूर्ण आशिया खंडावर नियंत्रण असावे, अशी चीनची ईच्छा आहे. मात्र, या मार्गात चीनला भारताचा अडथळा दिसत आहे. कोरोनावरूनही चीनची जगभरात नाचक्की होत असून अनेक देश विषाणूच्या उगमाचे कारण विचारत असल्याने चीनने जगाचे लक्ष वळविण्यासाठी आक्रमक धोरण स्वीकारल्याचे मत अनेकजण मांडत आहेत.