जम्मू-काश्मीर - मागील वर्षापासून नवीन तयार झालेल्या केंद्रशासित प्रदेश जम्मू आणि काश्मीर सध्या मोठ्या प्रमाणात घटते महसुली उत्पन्न आणि वाढत्या बेरोजगारीशी झुंजत आहे. मागील वर्षी केंद्र सरकारने जम्मू-काश्मीरला विशेष दर्जा देणारे आर्टिकल 370 रद्द केले होते. यानंतर येथे मोठ्या प्रमाणात आर्थिक भरभराट होईल, असे आश्वासन सरकारने दिले होते. मात्र, वास्तविक परिस्थिती पाहता असे घडलेले दिसत नाही.
पाच ऑगस्ट 2019 ला भारतीय जनता पक्षाच्या सरकारने केंद्रामध्ये जम्मू-काश्मीरची पुनर्रचना करण्याचे ऐतिहासिक विधेयक संसदेत संमत केले होते. यासोबतच जम्मू-काश्मीरचा विशेष दर्जा आणि त्याची राज्य म्हणून ओळख काढून घेण्यात आली होती. या निर्णयाची घोषणा करताना गृहमंत्री अमित शहा यांनी राज्यसभेत ‘जम्मू-काश्मीर हा भारताचा मुकुटमणी असल्याचे म्हटले होते. आम्हाला केवळ पाच वर्षे द्यावीत आणि आम्ही या प्रदेशाला देशातील सर्वाधिक विकसित राज्य बनवू,’ असे आश्वासन दिले होते.
यातील एक वर्ष आता निघून गेले आहे. मात्र, येथील आर्थिक स्थिती सुधारताना दिसत नाही. उलट ती अधिक बिघडल्याचे येथील रहिवाशांना वाटते. हा केंद्रशासित प्रदेश सध्या मोठ्या प्रमाणात घटते महसुली उत्पन्न आणि वाढती बेरोजगारी यांच्याशी झुंज देत असल्याचे चित्र आहे.
उद्योगधंदे संकटात
काश्मीर चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीजचे अध्यक्ष शेख आशिक अहमद यांनी ईटीव्ही भारतशी बोलताना, ‘जम्मू काश्मीरला मागील एका वर्षात सरकारने लागू केलेल्या लॉकडाऊनमुळे आणि आता covid-19 महामारीला रोखण्यासाठी लागू केलेल्या लॉकडाऊनमुळे अंदाजे चाळीस हजार कोटींचा फटका बसला आहे,’ असे सांगितले.
'जम्मू-काश्मीरला विशेष दर्जा देणारे आर्टिकल 370 आणि 35 मागील वर्षी ऑगस्टमध्ये रद्द झाल्यानंतर येथे सात महिने लॉकडाऊन आणि लोकांच्या मोकळेपणाने फिरण्यावर निर्बंध आले होते. यानंतर लगेच मार्च 2020 मध्ये कोरोना विषाणूचा प्रादुर्भावामुळे दुसऱ्यांदा लॉकडाऊन लागू करण्यात आला. या सर्व बाबींमुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेची मोठ्या प्रमाणात हानी झाली आणि येथील लहान-मोठे उद्योगधंदे, नोकऱ्या बंद झाल्या यामुळे बेरोजगारी वाढत आहे,' असे अहमद म्हणाले.
जम्मू काश्मीर इकॉनोमिक कॉनफेडरेशनचे सहसंयोजक अहमद खान यांनी ईटीव्ही भारतला सांगितले की,' बारा महिन्यांच्या लोक डाऊन मुळे ट्रान्सपोर्ट आणि पर्यटन व्यवसाय यांच्यासह सर्वच उद्योगांवर प्रचंड परिणाम झाला यामुळे प्रत्येकाला ढासळत्या अर्थव्यवस्थेचा आणि वाढत्या बेरोजगारीचा फटका बसत आहे.'
‘विशेष म्हणजे आतिथ्य आणि पर्यटन क्षेत्राकडून केंद्र सरकारच्या जम्मू-काश्मीरचा विशेष दर्जा काढून घेण्याच्या निर्णयाचे स्वागत झाले होते. येथील स्थिरता आणि सुरक्षितता वाढीस लागून त्याचा व्यवसायाला फायदा होईल असे म्हटले जात होते या क्षेत्राचे राज्याच्या जीडीपीमध्ये 15 टक्के योगदान आहे हा व्यवसाय अधिक वाढीस लागेल अशी आशा होती. मात्र, वारंवार वाढत गेलेल्या लॉकडाऊनमुळे ती धुळीस मिळाली आहे,’ असे ते म्हणाले.
‘’मागील एका वर्षात आमच्या हाऊसबोट व्यवसायाला दोनशे कोटींचा फटका बसला आहे,' असे हाऊस पोर्ट मालक संघटनेचे मुख्य सचिव अब्दुल रशीद यांनी म्हटले आहे.