नवी दिल्ली - केंद्र सरकारने सोमवारी जम्मू काश्मीर राज्याला विशेष दर्जा देणारे राज्यघटनेतील कलम ३७० रद्द केले आहे. तेव्हापासून राज्यामध्ये तणावपूर्ण शांतता आहे. राज्याला दोन केंद्रशाशित प्रदेशामध्ये विभाजित करण्यात आले आहे. जम्मू काश्मीर विभाजन विधेयक आज लोकसभेमध्ये मांडले आहे. दरम्यान, या निर्णयाचा पाकिस्तानने निषेध केला आहे. काश्मीर वादाचा मुद्दा असून हे प्रकरण आंतरराष्ट्रीय न्यायालयात नेणार असल्याचे पाकिस्तानने म्हटले आहे.
दोडा जिल्ह्यामध्ये शांतता असून लोकांनी संयम बाळगल्याबद्दल जिल्हाधिकारी डी. एस. दत्तात्रय यांनी लोकांचे आभार मानले. संचारबंदी काळामध्ये महत्त्वाच्या सेवांसाठी पास दिल्याचेही त्यांनी सांगितले. कलम १४४ अंतर्गत राज्यातील अनेक जिल्ह्यात संचारबंदी लागू करण्यात आली आहे. शाळा महाविद्यालयांना सुट्टी देण्यात आली आहे. सैन्य राज्याच्या विविध भागांत तैनात करण्यात आले आहे. लष्कर आणि हवाईदलाला सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. कोणतीही अनुचित घटना घडू नये म्हणून किंवा अफवा पसरु नये म्हणून इंटरनेट आणि मोबाईल सेवा खंडित करण्यात आली आहे.