श्रीनगर- जम्मू-काश्मीरमधील अनुच्छेद 370 हटवल्यानंतर खोऱ्यातील परिस्थितीची माहिती देण्यासाठी जम्मू काश्मीरचे मुख्य सचिव बीव्हीआर सुब्रमण्यम यांनी शुक्रवारी दुपारी पत्रकार परिषद घेतली. यावेळी ते म्हणाले की, जम्मू-काश्मीरमध्ये निर्माण होऊ शकणाऱ्या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर सरकारने प्रतिबंधात्मक उपाय राबवले आहेत. या काळात सीमापार दहशतवाद्यांकडून असणारा धोका नाकारता येत नाही. तसेच दहशतवादी जम्मू-काश्मीरमध्ये काही घातपात करणार असल्याची माहिती मिळत आहे. त्यामुळे खोऱ्यात काही निर्बंध लावण्यात आल्याचे सुब्रमण्यम यांनी म्हटले. मात्र, परिस्थिती सुधारताच सर्व निर्बंध शिथील करण्यात येतील, असेही त्यांनी म्हटले आहे.
परिस्थिती पूर्वपदावर आणणे हे सराकरचे मुख्य ध्येय आहे. मात्र, दहशतवाद्यांना कोणतीही संधी मिळू नये यासाठी उपाययोजना केल्या जात आहेत. लोकांची मुक्त संचार बंदी , मोबाईल-इंटेरनेट सुविधा आणि खोऱ्यातील शाळा-कॉलेज बंद आहेत. कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी काही लोकांना नजरकैदेत ठेवले असल्याचे सुब्रमण्यम यांनी सांगितले.