CAAवरून 'या' नेत्याने दिली थेट अमित शाहांना धमकी.. - jamiat ulema e hind state president threatened home minister
पश्चिम बंगालचे मंत्री आणि जमियत उलेमा-ए-हिंद चे प्रदेशाध्यक्ष सिद्दिकउल्ला चौधरी यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना थेट धमकीच दिली आहे.
कोलकाता - नागरिकत्व सुधारणा कायदा आणि राष्ट्रीय नागरिकत्व नोंदणीविरोधात देशभरात आंदोलन सुरू आहेत. या पार्श्वभूमीवर पश्चिम बंगालचे मंत्री आणि जमीयत उलेमा-ए-हिंद चे प्रदेशाध्यक्ष सिद्दिकउल्ला चौधरी यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना थेट धमकीच दिली आहे. CAA विधेयक मागे न घेतल्यास कोलकत्यात पाय ठेवू देणार नाही, असे चौधरी यांनी म्हटले आहे.
नागरिकत्व सुधारणा कायदा मागे घ्यावा, नाही तर जेव्हा मोदी कोलकता दौऱ्यावर येतील. तेव्हा आम्ही त्यांना विमानतळाच्या बाहेर पडू देणार नाहीत. त्यासाठी आम्ही तेथे एक लाख लोक जमा करू शकतो, असे चौधरी म्हणाले.
आमचा हिंसक प्रदर्शन करण्यामध्ये विश्वास नाही. आम्ही शांततेमध्ये एनआरसी आणि सीएएचा जोरदार विरोध करू. मोदींच्या 56 इंचाच्या छातीने लोकांना निराश केले असून मोदी द्वेष आणि विभाजणाचे राजकारण करत आहेत, असेही चौधरी म्हणाले.
पश्चिम बंगालमध्ये नागरिकत्व सुधारणा कायदा आणि राष्ट्रीय नागरिकत्व नोंदणी विरोधात मोर्चे काढण्यात आले आहेत. देशामध्ये बऱ्याच ठिकाणी आंदोलनाला हिंसक वळण मिळाले. यामध्ये उत्तर प्रदेशमधील १५ जणांचा, तर कर्नाटकमधील दोघांचा जीव गेला आहे.