सीएए विरोधात आता जामियामधील विद्यार्थी बसले उपोषणाला
जामिया मिलीया विद्यापीठातील विद्यार्थ्यांनी नागरिकत्व सुधारणा कायद्याविरोधात आता उपोषणाला बसले आहेत. पोलिसांनी निशस्त्र विद्यार्थ्यांवर हल्ला केल्यामुळे उपोषणाला बसलो आहोत, असे विद्यार्थ्यांनी सांगितले.
नवी दिल्ली- जामिया मिलीया विद्यापीठातील विद्यार्थ्यांनी नागरिकत्व सुधारणा कायद्याविरोधात आता उपोषणाला बसले आहेत. पोलिसांनी हिंसाचार केल्याचा आरोप या विद्यार्थ्यांनी केला. पोलिसांच्या या कृत्याला विरोध करत असल्याचेही त्यांनी म्हटले आहे. हा कायदा मागे घ्यावा, अशी मागणी विद्यार्थ्यांनी केली आहे.
जामिया विद्यापीठातील अब्दुल खालिद, महमूद अन्वर, सलीम यांच्यासह इतर विद्यार्थी उपोषणाला बसले आहेत. 'सीएए कायद्याला विरोध करताना पोलिसांनी आंदोलकांवर अत्याचार केले. पोलिसांच्या या दडपशाहीचा आम्ही निषेध करतो. सीएए कायदा असंवैधानिक असून सरकारने तो माघारी घ्यावा,' अशी मागणी विद्यार्थ्यांकडून होत आहे. पोलिसांनी निशस्त्र विद्यार्थ्यांवर हल्ला केल्यामुळे उपोषणाला बसलो आहोत, असे विद्यार्थ्यांनी सांगितले.
'सीएए कायद्याचा भारतातील नागरिकांवर काहीही दुष्परिणाम होणार नाही. त्यामुळे आंदोलकांमध्ये सामान्य नागरिकांचा समावेश नाही. पाकिस्तानची गुप्तचर संस्था आयएसआय, मुस्लीम कट्टरतावादी तसेच जामिया आणि अलीगढ विद्यापीठांमध्ये बसलेले लोकच या गोष्टीचा बाऊ करत आहेत. त्यांचा भारताच्या धर्मनिरपेक्षतेवर विश्वास नाही. तसे असते, तर जामिया विद्यापीठात मुस्लिमांसाठी ५० टक्के आरक्षण दिले गेले नसते,' असा आरोप मागील आठवड्यात पाकिस्तानातून निष्कासीत करण्यात आलेले आणि सध्या कॅनडामध्ये राहणारे लेखक तारिख फतेह यांनी केला आहे.