नवी दिल्ली - भाजप खासदार अनंत कुमार हेगडे यांच्या महात्मा गांधींवरील वक्तव्यामुळे नव्या वादाला तोंड फूटले आहे. महात्मा गांधींच्या नेतृत्वात लढला गेलेला स्वातंत्र्य लढा नाटक होते, असे हेगडे यांनी केले होते. त्यावरून काँग्रेसने भाजपवर निशाणा साधला आहे. 'पक्षातील वाढती गोडसे भक्तांची संख्या पाहता भाजपने आपल्या पक्षाचं नाव बदलून नथुराम गोडसे पक्ष असे ठेवावं, असे काँग्रेस नेता जयवीर शेरगिल म्हणाले.
'जे लोक इंग्रजांचे चमचे होते. ज्यांनी इंग्रजांसाठी काम केले. अश्या लोकांच्या पक्षाकडून महात्मा गांधींना देशभक्तीच्या प्रमाणपत्राची गरज नाही. ज्या संघटनेने देशाच्या तिरंगाच्या, संविधनाचा आणि चले जाव चळवळीचा विरोध केला. त्या संघटननेमधून अनंत हेगडे येतात. ज्याप्रकारे पक्षात गोडसे भक्तांची संख्या वाढत आहे. त्यावरून भाजपने आपल्या पक्षाचं नाव बदलून नथुराम गोडसे पक्ष असे ठेवावं', असे शेरगील म्हणाले.'साध्वी प्रज्ञा ठाकूर यांनी सतत महात्मा गांधींचा अपमान केला. त्यांच्यावर ज्या प्रकारे कारवाई करण्यात आली नाही. तसेच अनंत हेगडेवरदेखील पंतप्रधान कारवाई करणार नाहीत. गोडसे आणि महात्मा गांधी या दोघांपैकी कोणाप्रती आपली निष्ठा आहे, हे मोदींनी सिद्ध करावे', असेही शेरगील म्हणाले.काय म्हणाले होते हेगडे...बंगळुरूत एका कार्यक्रमाला संबोधीत करताना भाजप खासदार अनंत कुमार हेगडे यांनी वादग्रस्त वक्तव्य केले. महात्मा गांधींच्या नेतृत्वात लढला गेलेला स्वातंत्र्य लढा नाटक होते. ही खरी लढाई नसून हा जुळवून आणलेला लढा होता. तसेच महात्मा गांधींचे उपोषण आणि सत्याग्रह हेही नाटकच होते. गांधींच्या उपोषण आणि सत्याग्रहामुळे देशाला स्वातंत्र्य मिळाले असे काँग्रेसला पाठिंबा देणारे लोक मानतात. हे खोटे असून इंग्रजांनी निराशेतून भारताला स्वातंत्र्य दिले. जेव्हा मी इतिहास वाचतो तेव्हा माझे रक्त खवळते, असे हेगडे म्हणाले होते.