नवी दिल्ली - काश्मीरला विशेष दर्जा देणारे कलम ३७० रद्द केल्यानंतर भारतावर दहशतवादी हल्ल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्यातच गुप्तचर यंत्रणेच्या हाती आलेल्या माहितीनुसार जैश- ए- मोहम्मद दहशतवादी संघटना भारतातील एअर फोर्सच्या तळांवर हल्ल्याचा कट आखत असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे लष्करी तळांना 'हाय अलर्ट'वर ठेवण्यात आले आहे.
८ ते १० दहशतवाद्यांचा गट वायू सेनेच्या तळांवर हल्ला घडवून आणण्याच्या तयारीत असल्याची माहिती गुप्तचर यंत्रणेला मिळाली आहे. काश्मीर परिसरातील वायू सेनेच्या तळांवर आत्मघाती हल्लेखोरांकरवी हल्ला घडवून आणण्याचा प्रयत्न दहशतवादी करत असल्याची माहिती पुढे आली आहे. या माहितीच्या पार्श्वभूमीवर श्रीनगर, अवंतीपोरा, पठाणकोट, हिंदोन, जम्मू येथील वायू सेनेच्या तळांना हाय अलर्टवर ठेवण्यात आले आहे.