नवी दिल्ली - केंद्रीय गृह मंत्रालयाने सर्व सुरक्षा आणि गुप्तहेर यंत्रणांना 'अलर्ट' दिला आहे. पाकिस्तानस्थित जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेकडून भारतातील महत्त्वाच्या ठिकाणांवर हल्ले होण्याची तसेच, घातपाती कृत्ये केली जाण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर गृह मंत्रालयाने सुरक्षा आणि गुप्तहेर यंत्रणांना सावधानतेचा इशारा दिला आहे.
भारतीय गुप्तहेर विभागाने पाकिस्तानस्थित दहशतवादी संघटना जैश-ए-मोहम्मद देशात घातपाती कृत्ये घडवून आणण्याची शक्यता असल्याचा अहवाल दिला आहे. भारतीय संसदेने जम्मू-काश्मीरसंबंधित आर्टिकल ३७० रद्द करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर बिथरलेल्या पाकिस्तानकडून गंभीर परिणामांचा इशारा देण्यात आला होता. या पार्श्वभूमीवर पाकिस्तान शक्य त्या सर्व वैध-अवैध मार्गांचा अवलंब करण्याची शक्यता आहे. आता गुप्तहेर विभागाने जम्मू-काश्मीर, दिल्ली, मुंबई आदी ठिकाणी घातपाती कृत्ये करण्याची शक्यता वर्तविली आहे.