लखनऊ : कोरोना महामारीच्या काळात देशातील सायबर गुन्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झालेली दिसून येत आहे. अगदी लखनऊचे सहाय्यक पोलीस उपायुक्तही यातून सुटले नाहीत, हे विशेष!
काही अज्ञातांनी लखनऊ सहाय्यक पोलीस आयुक्त अभय कुमार मिश्रा यांचे फेक फेसबुक पेज तयार केले. त्यानंतर त्यांनी मिश्रा यांच्या फ्रेंडलिस्टमधील आणि संपर्कातील व्यक्तींकडून पैसे उकळण्याचा प्रयत्नही केला. त्यांनी मिश्रांच्या फ्रेंडलिस्टमधील काही लोकांना तातडीने पाच हजार रुपयांची मागणी केली. यानंतर मिश्रांच्या एका मित्राने त्यांना संपर्क साधत याबाबत चौकशी केल्यानंतर हे प्रकरण उघडकीस आले.
आयडेंटिटी क्लोनिंग माहिती.. मिश्रा यांनी तातडीने सायबर सेलला संपर्क साधत या प्रकाराची माहिती दिली. सायबर सेलने तपास सुरू केल्यानंतर अशा प्रकारची तब्बल १२ प्रकरणे समोर आली, ज्यामध्ये कोणा व्यक्तीचे फेक अकाऊंट बनवून त्या व्यक्तीच्या नातेवाईकांना आणि मित्रांना पैशाची मागणी केली जात होती.
याबाबत बोलताना सायबर सेलचे सहाय्यक पोलीस आयुक्त विवेक रंजन राय म्हणाले, की अशा प्रकारच्या घटना टाळण्यासाठी सोशल मीडिया वापरणाऱ्या लोकांनी अधिक सजग राहणे आवश्यक आहे. यासाठी आपण विविध उपक्रम राबवत असल्याचेही त्यांनी ईटीव्ही भारतशी बोलताना स्पष्ट केले. सोशल मीडियावर, विशेषतः फेसबुकवर आपली फ्रेंडलिस्ट ही हाईड करून ठेवावी, असा सल्ला त्यांनी यावेळी दिला आहे.