नवी दिल्ली - काँग्रेस सचिव प्रियांका गांधी यांनी आज यूट्यूबवरुन जनतेला संबोधित केले. यामध्ये त्यांनी उत्तर प्रदेशमध्ये सध्या सुरू असलेल्या बसेसच्या मुद्द्याबाबत आपली बाजू मांडली. तसेच, त्यांनी योगी सरकारला या बसेसना परवानगी देण्यासाठी पुन्हा आवाहन केले. 'तुम्हाला त्या बसेसवर भाजपचे झेंडे लावा, जर पक्षाचे पोस्टर त्यावर लावायचे असतील तर तेही करा किंवा मग या बसेसचे आयोजन तुम्हीच केले असे म्हणा; मात्र या बसेसना राज्यात येऊ द्या' असे आवाहन प्रियांका गांधींनी केले आहे.
आपल्या सर्वांना आपली जबाबदारी समजून घेणे आवश्यक आहे. परराज्यांमध्ये अडकून पडलेले स्थलांतरीत कामगार हे फक्त भारतीय नाहीत, तर देशाच्या व्यवस्थेचा कणा आहेत. त्यांच्या मेहनतीवर आपला देश पुढे जातो. त्यामुळे आपल्या सर्वांचीच ही जबाबदारी आहे, की या संकटकाळात त्यांची मदत करावी. ही वेळ राजकारण करण्याची नाहीये, असेही गांधी म्हणाल्या.