नवी दिल्ली -कोरोना काळात सरकारी आणि खासगी डॉक्टरांना वेतन मिळत नसल्यावरून सर्वोच्च न्यायालयात जनहितयाचिका दाखल झाली आहे. या प्रकरणाची सुनावणी आज(शुक्रवारी) झाली. 'कोरोना हे एक युद्धच आहे. आपण युद्धाच्या काळात सैनिकांना नाराज ठेवू शकत नाही. त्यांना आनंदी ठेवायला हवे, असे मत सर्वोच्च न्यायालयाने व्यक्त केले.
न्यायमूर्ती अशोक भूषण यांच्या अध्यक्षतेखाली संजय किशन कौल आणि एम. आर. शहा यांच्या पीठाने या प्रकरणी सुनावणी केली. आपण युद्धाच्या काळात सैनिकांना नाराज ठेवू शकत नाही. कोरोना युद्ध्यांना सुरक्षित वाटण्यासाठी आपण थोडे जास्त प्रयत्न करायला पाहिजे. मागील काही दिवसांत डॉक्टर संपावर गेले असे तुम्ही पाहिले का? या प्रकरणी न्यायालयाच्या हस्तक्षेपाची गरज नाही. तुम्ही आणखी प्रयत्न करा. हा मुद्दा डॉक्टरांच्या चिंतेचा असल्याचे निरिक्षण न्यायाधिशांनी नोंदविले.