नवी दिल्ली -चीनबरोबरच्या सीमावादाच्या पार्श्वभूमीवर भारतीय लष्कर आणि सरकारही अधिक सतर्क झाले आहे. भारत आणि चीनमध्ये डोंगराळ, पहाडी आणि खडकाळ भागात 3 हजार किमीपेक्षा जास्त लांबीची सीमारेषा आहे. या खडतर प्रदेशात इंडो तिबेटियन बॉर्डर पोलिसांना सीमेवर जवानांची आणि सामानाची जलद वाहतूक करण्यासाठी उच्च ताकदीची (हाय पॉवर) वाहने देण्यात येणार आहेत.
अंतर्गत सुरक्षेसंबधी संसदेच्या स्थायी समितीमध्ये सीमा भागातील जलद हालचाल गरजेची असते असा विषय चर्चला आला होता. आणीबाणीच्या काळात तर जास्तच गरजेचे असते, असे समितीच्या लक्षात आल्यानंतर अत्याधुनिक वाहने देण्याचा निर्णय घेण्यात आला. जवानांना विना अडथळा आणि जलद एका ठिकाणावरुन दुसऱ्या ठिकाणी जाता आले पाहिजे. त्यासाठी दिरंगाई न करता विशेष वाहने जवानांना देण्यात यावीत, असे समितीने सुचविले आहे, काँग्रेस नेते आनंद शर्मा यांच्या अध्यक्षतेखालील समितीने मार्च महिन्यात या सुचना केल्या होत्या त्यानुसार आता या गाड्या उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.