नवी दिल्ली – स्वेदशी उत्पादनाला चालना देण्यासाठी सरकारने महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. इंडो-तिबेटियन सीमा पोलिसांनी (आयटीबीपी) खादी आणि ग्रामोद्योग आयोगाबरोबर (केव्हीआयसी) आज करार केला आहे. या करारांतर्गत केंद्रीय सशस्त्र पोलीस दलाला (सीएपीएफ) खादी ग्रामोद्योकडून मोहरीचे तेल आदी पुरवठा करण्यात येणार आहे.
आयटीबीपीबरोबर झालेल्या करारानुसार खादी ग्रामोद्योग आयोगाला 1200 क्विंटल मोहरीच्या तेलाचा पुरवठा करावा लागणार आहे. या तेलाची किंमत 1.73 कोटी रुपये आहे. हा करार केव्हीआयसीचे चेअरमन विनय कुमार सक्सेना आणि आयटीबीपीच्या महासंचालनायाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांमध्ये झाला आहे.
केंद्रीय गृह मंत्रालयात केंद्रीय सशस्त्र पोलीस दलालाच्या महासंचालकांची बैठक ऑक्टोबर 2019 मध्ये झाली होती. या बैठकीत जवानांच्या गणवेशासाठी स्वदेशी असलेल्या खादीचा वापर करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. तर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी डिसेंबर 2019 मध्ये आयटीबीपीच्या नवी दिल्लीतील मुख्यालयाला भेट दिली होती. त्यावेळी खादी ग्रामोद्योग आयोगाकडून विविध वस्तुंचे प्रदर्शन ठेवण्यात आले होते. यावेळी टॉवेल, मोहरीचे तेल, योगा कीट, रुग्णालयातील बेडशीट, लोणचे आदी जवानांसाठी लागणाऱ्या उत्पादनांची खादी ग्रामोद्योग आयोगाकडून आयटीबीपीने खरेदी करण्याचे त्यांनी सूचविले होते.
आयबीटीपीकडून पहिल्या टप्प्यात गालिचा, टॉवेल व ब्लँकेटची खरेदी खादी ग्रामोद्योग आयोगाकडून करण्यात येणार आहे. आयटीबीपीकडून 2.5 लाख गालिचे केंद्रीय सशस्त्र पोलीस दलासाठी खरेदी करण्यात येणार आहे. या गालिच्यांची एकूण किंमत 17 कोटी रुपये आहे.