नवी दिल्ली - भारतासह जगभरात रविवारी सहावा आंतरराष्ट्रीय योग दिन म्हणून साजरा केला जात आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आज घरात राहूनच योग दिन साजरा केला जात आहे. इंडो-तिबेटियन बॉर्डर पोलीस (ITBP) जवानांनी लडाखमध्ये अक्षरक्ष: हाडं गोठवणाऱ्या थंडीत योग करत योग दिन साजरा केला. जवानांनी तब्बल १८ हजार फुटांवर हा योग केला.
दरवर्षी योग दिन एका विशिष्ट थीमला म्हणजेच विषयाला अनुसरून साजरा करण्यात येतो. यावर्षीच्या योग दिनाची थीम आहे, "योगा फॉर हेल्थ-योगा अॅट होम". म्हणजेच, आरोग्यासाठी योग, घरच्या घरी योग! कोरोना विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी जगभरातील नागरिकांना फिजिकल डिस्टन्सिंग पाळण्याचे आवाहन करण्यात येत आहे. त्यामुळेच, याआधी साजऱ्या केल्या गेलेल्या योग दिवसांप्रमाणे एकत्र येऊन योगाभ्यास न करता, लोकांना आपापल्या घरातच योगासने करण्याचे आवाहन यावर्षी करण्यात येत आहे.