नवी दिल्ली -सोमवारी सकाळीपासूनच पक्ष नेतृत्वाच्या मुद्यावरून काँग्रेसमध्ये 'हाय वोल्टेज ड्रामा' सुरू झाला होता. काँग्रेससमोर असलेल्या विविध आव्हानांवर तोडगा काढण्यासाठी बोलावण्यात आलेल्या या अधिवेशनात केवळ यथास्थिती मान्य करण्यता आली. राहुल गांधी पक्षाचा भार घेण्यास तयार होत नाहीत, तोपर्यंत सोनिया गांधीच पक्षाच्या अंतरिम अध्यक्षा राहणार आहेत. अध्यक्षपदासाठीची निवडणूक कधी होणार याचा निर्णय मात्र घेण्यात आला नाही. असे होणार हे जवळपास सर्वांनाच अपेक्षित होते, त्यामुळे ही कोणासाठी आश्चर्याची बाब नव्हती. मात्र, हाच निर्णय एका पत्रकाद्वारे जाहीर करणे शक्य असतानाही, काँग्रेसच्या सर्वशक्तिशाली अशा कार्यकारिणीला बोलावून तब्बल सात तास चर्चा करणे, हे मात्र आश्चर्यकारक होते.
पक्षाला पूर्णवेळ अध्यक्ष हवा, आणि संघटनात्मक पातळीवर सुधारणा हव्यात अशी मागणी करणारे पत्र काँग्रेसच्या २३ वरिष्ठ नेत्यांनी सोनिया गांधींना लिहीले होते. याबाबत चर्चा करण्यासाठी सोमवारचे अधिवेशन भरवण्यात आले होते. मात्र या उघडपणे भरवण्यात आलेल्या अधिवेशनामुळे विरोधकांनाच उकळ्या फुटल्या. कारण २०१४मध्ये भाजपकडून मोठी हार पत्करावी लागलेला काँग्रेस पक्ष अजूनही आपल्या अंतर्गत कलहातच अडकून पडला आहे, आणि उभारण्याची धडपड करतो आहे हेच या अधिवेशनामुळे समोर आले.
सोनिया गांधींची प्रकृती, आणि काँग्रेसचे देशाच्या राजकारणातील स्थान पाहता पक्षातील वरिष्ठ नेत्यांच्या मागण्या रास्त वाटतात. देशातील प्रमुख विरोधी पक्ष म्हणून सत्ताधारी भाजपला कसे नमवता येईल याबाबत चर्चा करण्याऐवजी काँग्रेस कार्यकारिणी पक्षातील ज्येष्ठ नेते आणि राहुल समर्थक यांच्यातील वाद सोडवण्यात आपला वेळ घालवत आहे.
मतभेद करणारे लोक भाजपच्या पावलावर पाऊल टाकत आहेत, अशी राहुल यांनी केलेली कथित टीका माध्यमांमध्ये गाजली, आणि याचा तोटा काँग्रेसला झाला. पक्षाने तातडीने राहुल असे काही बोलल्याचे नकारले. तसेच, राहुल यांनीही कपिल सिब्बल यांच्यासोबत त्वरीत फोनवर चर्चा करुन त्यांचा गैरसमज दूर केला. सिब्बल यांनी त्यानंतर आपले नाराजीचे ट्विट मागे घेतले. मात्र, त्यानंतर पक्षातील आणखी एक ज्येष्ठ नेते गुलाम नबी आझाद यांनी आपले भाजपसोबत संबंध आहेत असे सिद्ध झाले, तर आपण पक्षाचा राजीनामा देऊ अशा आशयाचे ट्विट केले.
आझाद आणि सिब्बल यांच्या प्रतिक्रिया आणि त्यासंबंधित घटना हेच दर्शवतात, की गांधी घराण्यामध्ये अजूनही पक्षाला एकत्र जोडून ठेवण्याची क्षमता आहे. पक्षातील काही सहकाऱ्यांच्या टिप्पणीमुळे आपल्याला दुःख झाले असल्याचे सोनिया गांधींनी म्हटले, मात्र सरतेशेवटी सर्व एकमतावर आले होते. कार्यकारिणीच्या बैठकीमध्ये पक्षातील नेतृत्त्वावर टीका करणाऱ्या नेत्यांनी, आपण केवळ पक्षासमोरील आव्हाने समोर यावीत, त्यांच्यावर लक्ष जावे यासाठी सोनिया गांधींना पत्र लिहिल्याचे स्पष्ट केले. तसेच त्यांनी एकमताने सोनिया गांधींना पक्षामध्ये बदल करण्याचे अधिकारही प्रदान केले. राहुल गांधींच्या समर्थकांनी, राहुल यांना अध्यक्ष करा अशी मागणी लाऊन धरली होती. या सर्वामध्ये, 'गांधी घराण्याऐवजी आणखी कोणी अध्यक्ष' याबाबत मात्र कोणतीही चर्चा झाली नाही.
अध्यक्षपदासाठीचा वाद सध्या तरी शमला असल्याचे वाटत असले, तरीही पक्षाच्या हितासाठी म्हणून २३ नेत्यांनी केलेल्या मागण्यांकडे दुर्लक्ष करणे पक्षाला चालणार नाही. हेच काँग्रेससमोरील मोठे आव्हान असणार आहे, कारण पक्षाने अध्यक्षपदाचा वाद हा 'गांधी'विरोधी प्रोपोगंडा असल्याचे म्हटले आहे, आणि पक्षातील नेत्यांना अंतर्गत वाद चव्हाट्यावर न मांडण्याची तंबी दिली आहे.
- अमित अग्निहोत्री