नवी दिल्ली-भाजपचे ज्येष्ठ नेते मुरली मनोहर जोशी यांनी जेएनयूच्या कुलगुरूंच्या कार्यपद्धतीबद्दल प्रश्नचिन्ह उपस्थित केला आहे. जेएनयू वाद सोडविण्याबाबत शासनाच्या प्रस्तावावर अमल न करण्यावर कुलगरू ठाम आहेत, ही बाब आश्चर्यचकित करणारी असल्याचे मुरली मनोहर जोशी यांनी ट्विट केले आहे.
जेएनयूतील प्रवेश शुल्क वाढ आणि होस्टेल नियमावलीबाबतचा वाद आता विकोपाला गेला आहे. जेएनयूच्या कुलगुरू एम. जगदीश कुमार यांच्या राजीनाम्याची विद्यार्थ्यांकडून मागणी केली जात आहे. या मागणीसाठी आज विद्यार्थ्यांनी मनुष्यबळ मंत्रालयासमोर देखील आंदोलन केले. मात्र, आता राजकीय वर्तुळातूनही कुलगुरूंच्या कार्यपद्धतीवर शंका व्यक्त केली जात आहे. वाद शमवन्यासाठी केंद्र सरकारने कुलगुरूंना काही प्रस्ताव दिले होते. त्याची अमलबजावणी कुलगुरूंनी केली नाही, हे धक्कादायक आहे. कुलगुरूंचे हे वर्तन योग्य नसून माझ्या मते अशा कुलगुरूला पदावर राहू देऊ नये, असे मुरली मनोहर जोशी यांनी ट्विट केले आहे.