मुख्यमंत्री कमलनाथ यांच्या पुतण्याचा ३०० कोटींचा बंगला जप्त; प्राप्तिकर विभागाची कारवाई - मुख्यमंत्री कमलनाथ
दिल्लीतील उच्चभ्रू वस्तीत असणाऱ्या पुरी यांच्या ३०० कोटींच्या बंगल्यावर प्राप्तिकर विभागाकडून जप्ती आणली आहे. ऑगस्टावेस्टलँड हेलिकॉप्टर घोटाळ्यात रतुल पुरी याने मनी लाँड्रींग केली असल्याचाही आरोप आहे.
नवी दिल्ली- मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री कमलनाथ यांचा पुतण्या रतुल पुरीविरोधात प्राप्तिकर विभागाने मोठी कारवाई केली आहे. दिल्लीतील उच्चभ्रू वस्तीत असणाऱ्या पुरी यांच्या ३०० कोटींच्या बंगल्यावर प्राप्तिकर विभागाकडून जप्ती आणली आहे. ऑगस्टावेस्टलँड हेलिकॉप्टर घोटाळ्यात रतुल पुरी याने मनी लाँड्रींग केली असल्याचाही आरोप आहे.
दिल्लीतील ल्युटन्स परिसरातील डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम मार्गावर हा बंगला आहे. मोसर बेअर ग्रुपच्या नावावर हा बंगला नोंदणीकृत असून या ग्रुपचे मालक रतुल पुरी यांचे वडील दीपक पुरी आहेत. बेनामी संपत्ती कायद्यातंर्गत ही कारवाई करण्यात आली असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.
प्राप्तिकर विभागाकडून पुरी यांच्या ४० दशलक्ष डॉलरच्या थेट परदेशी गुंतवणुकीवरही गदा आणली आहे. ही कारवाई बेनामी संपत्ती विरोधी कायद्यानुसार झाली असून रतुल पुरी आणि दीपक पुरी यांच्याशी संबंधित गुन्हा असल्याचे अधिकाऱ्यांने सांगितले. रतुल पुरीविरोधात प्राप्तिकर विभागाने केलेली ही दुसरी कारवाई आहे.