बंगळुरू - भारतीय अवकाश संशोधन संस्थेच्या (इस्रो) बहुचर्चित अशा 'गगनयान' मोहिमेसाठी अंतराळवीरांचे प्रशिक्षण सुरू करण्यात येणार आहे. जानेवारीच्या तिसऱ्या आठवड्यापासून रशियामध्ये हे प्रशिक्षण सुरू होईल. इस्रोचे प्रमुख के. सिवन यांनी याबाबत माहिती दिली.
काय आहे 'गगनयान' मोहीम..?
अवकाशात अंतराळवीर पाठवण्यासाठी इस्रो गेली कित्येक वर्षे प्रयत्न करत आहे. या मोहिमेसाठी कधी तांत्रिक अडथळे आले, तर कधी निधीची कमतरता. या सर्व अडथळ्यांनंतर, अखेर २०१८ च्या डिसेंबर महिन्यात या मोहिमेला सरकारकडून परवानगी मिळाली. तसेच, १० हजार कोटींचा निधीदेखील इस्रोला देण्यात आला. त्यानंतर महिनाभरातच इस्रोने बंगळुरूमध्ये मानवी अंतराळ उड्डाण केंद्राची (ह्युमन स्पेस फ्लाईट सेंटर) स्थापना केली.