बंगळुरु - भारताचे दुसरे चांद्रयान १५ जुलैला चंद्राकडे झेपावणार आहे. भारत दुसऱ्यांदा ही मोहीम राबवत आहे. याआधी चांद्रयान -१ने भारताच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला होता. पहाटे २ वाजून ५१ मिनिटांनी हे यान चंद्राकडे झेपावणार आहे. भारतीय अंतराळ संशोधन संस्थेचे (इस्रो) अध्यक्ष डॉ. के. शिवन यांनी आज (बुधवार) पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. या मोहिमेसंदर्भातील एका वेबसाईटचे उद्घाटनही यावेळी डॉ. शिवन यांच्या हस्ते झाले.
ठरलं तर.. १५ जुलैला चांद्रयान-२ अवकाशात झेपावणार - dr. sivan
'चांद्रयान-२ १५ जुलै रोजी पहाटे २ वाजून ५१ मिनिटांनी प्रक्षेपित केले जाईल. याचे लँडर, रोव्हर आणि ऑर्बिटर असे तीन भाग असतील. ६ किंवा ७ सप्टेंबरला हे यान चंद्राच्या कक्षेत पोहोचेल,' असे डॉ. शिवन यांनी सांगितले.
'चांद्रयान-२ १५ जुलै रोजी पहाटे २ वाजून ५१ मिनिटांनी प्रक्षेपित केले जाईल. याचे लँडर, रोव्हर आणि ऑर्बिटर असे तीन भाग असतील. रोव्हर हे एक रोबोटिक यंत्र असून त्याचे वजन २७ किलो असून लांबी १ मीटर आहे. लँडरचे वजन १.४ टन आणि लांबी ३.५ मीटर आहे. तर ऑर्बिटरचे वजन २.४ टन आणि लांबी २.५ मीटर इतकी आहे. याच्याद्वारे काही विशिष्ट प्रयोग घडवून आणण्यात येणार आहेत. ६ किंवा ७ सप्टेंबरला हे यान चंद्राच्या कक्षेत पोहोचेल,' असे डॉ. शिवन यांनी यानाच्या तांत्रिक बाबींची माहिती देताना सांगितले.
हे यान चंद्रावर प्रत्यक्षात कसे उतरेल याबाबत डॉ. शिवन यांनी माहिती दिली. 'लँडरला ऑर्बिटरच्या वरती ठेवण्यात येईल. लँडर, ऑर्बिटर आणि रोव्हरला एकत्रितपणे 'कंपोझिट बॉडी' असे संबोधण्यात आले आहे. या बॉडीला GSLV mk lll लॉन्च व्हेईकलमध्ये शील्डमध्ये ठेवण्यात येईल. १५ जुलैला यानाचे प्रत्यक्ष प्रक्षेपण झाल्यानंतर GSLV mk lll मधून कपोझिट बॉडीला बाहेर ढकलले जाईल. त्यानंतर कंपोझिट बॉडीच्या खालच्या भागातून इंधनाचे ज्वलन सुरु झाल्यानंतर ही बॉडी चंद्राच्या दिशेने झेपावेल. त्यानंतर काही दिवसांनी ती चंद्राच्या कक्षेत पोहोचेल,' असे ते म्हणाले.