'इस्रो स्पिरीट' देशभर पसरलंय..चांद्रयान मोहिमेने देशाला एकत्र बांधलं - मोदी - विक्रम लँडर
देश यश आणि अपयशाच्या पलिकडे पाहत आहे. नकारात्मक विचारांना लोक आता थारा देत नाही, असे पंतप्रधान मोदी चांद्रयान मोहिमेत आलेल्या अडथळ्यानंतर म्हणाले.
चंदीगड - इस्रो स्पिरीट' संपूर्ण देशामध्ये पसरले आहे. संबध भारत चांद्रयान २ मोहिमेमुळे एकत्र बांधला गेला आहे. देश यश आणि अपयशाच्या पलिकडे पाहत आहे. नकारात्मक विचारांना लोक आता थारा देत नाही, असे पंतप्रधान मोदी चांद्रयान मोहिमेमध्ये आलेल्या अडथळ्यानंतर म्हणाले. हरियाणा राज्याच्या विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभुमीवर आयोजित विजय संकल्प यात्रेमध्ये ते बोलत होते.
७ सप्टेंबरला रात्री १.५० च्या दरम्यान संबध देश जागा झाला होता. देश खेळाडुंच्या खिलाडूवृत्तीप्रमाणे एकत्र बांधला गेला होता. इस्रोपासून मिळालेली प्रेरणा संबध भारतामध्ये पसरली आहे. देशवासीय आता नकारात्मक विचारांना धारा देत नाहीत, असे मोदी म्हणाले. सबंध देश चांद्रयान मोहीम पाहण्यासाठी टिव्हीपुढे बसला होता, असेही मोदी म्हणाले.
चांद्रयान २ मोहीमेच्या विक्रम लँडरचा नियंत्रण कक्षाशी संपर्क तुटल्यानंतर देशभरातून इस्रोला पाठिंबा देण्यात येत आहे. विक्रम लँडर चंद्रावर उतरत असताना संबध देशाने एकी दाखवून दिली, असे मोदी म्हणाले. इस्रो प्रमुख के. सिवन यांनी विक्रम लँडरशी संपर्क साधण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे सांगितले आहे. यासाठी १४ दिवसाचा वेळ लागू शकतो, असे ते म्हणाले. विक्रम लँडरचे स्थान समजले असल्याचे इस्रोने सांगितले आहे.