बंगळुरू - 'चांद्रयान-२'च्या 'आयआयआरएस पेलोड'ने चंद्राच्या पृष्ठभागाची पहिले छायाचित्र टिपले आहे. भारताची अवकाश संशोधन संस्था 'इस्रो'ने गुरुवारी ट्विट करत याबाबतची माहिती दिली.
"'चांद्रयान-२'च्या 'आयआयआरएस पेलोड'ने टिपलेले चंद्राच्या पृष्ठभागाचे पहिले छायाचित्र पहा. चंद्राच्या पृष्ठभागावरील अरूंद आणि संमिश्र कालव्यांमधून परावर्तित होणारा सूर्यप्रकाश मोजण्यासाठी आयआयआरएस डिझाईन करण्यात आले आहे." अशा आशयाचे ट्विट करत इस्रोने ही माहिती दिली.चंद्राच्या उत्तर गोलार्धातील काही भाग या छायाचित्रामध्ये दिसून येत आहे. तर सॉमरफील्ड, स्टेबबिन्स आणि किर्कवुड अशी काही मुख्य विवरे या छायाचित्रामध्ये दिसून येत आहेत.
हेही वाचा :बजाजच्या चेतक ई-स्कूटरचे लाँचिंग; ५ तासांच्या चार्जिंगवर ९५ किमीचे कापते अंतर
सौर स्पेक्ट्रमच्या प्रतिबिंबातील सिग्नेचर्सचा वापर करून चंद्राच्या पृष्ठभागावरील खनिजे आणि अस्थिर रचनेचे नकाशे तयार करणे, आणि त्याचा वापर करून चंद्राची उत्पत्ती आणि उत्क्रांतीचा अभ्यास करणे हा 'आयआयआरएस'चा प्रमुख उद्देश आहे.
चंद्राच्या पृष्ठभागावरील अरूंद आणि संमिश्र कालव्यांमधून परावर्तित होणारा सूर्यप्रकाश मोजण्यासाठी इमेजिंग इन्फ्रारेड स्पेक्ट्रोमीटर (आयआयआरएस) डिझाईन केले गेले आहे. परावर्तित झालेल्या सूर्यप्रकाशाच्या किरणांना वेगवेगळ्या थरांमध्ये विभागून, त्यांचा अभ्यास हे मशीन करते, असेही इस्रोने स्पष्ट केले.
हेही वाचा : ओडिशाच्या विद्यार्थ्यांनी विकसीत केले वणव्याचा इशारा देणारे यंत्र; 'नासा'ने केले कौतुक!