नवी दिल्ली -अयोध्या रामजन्मभूमी बाबरी मशीद जमीन विवाद प्रकरणातील मुख्य फिर्यादींपैकी इक्बाल अन्सारी यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयचा आदर करत असल्याचे म्हटले आहे. तसेच, या निर्णयाविरोधात कोणतीही याचिका दाखल करणार नसल्याचेही ते म्हणाले. सर्वोच्च न्यायालयाच्या या निर्णयामुळे हिंदू-मुस्लिमांमधील संघर्ष कायमचा संपेल, असे ते म्हणाले.
हार-जितीचा प्रश्न नाही, या निर्णयामुळे हिंदू-मुस्लिमांमधील तणाव कमी होईल - इक्बाल अन्सारी अन्सारी यांनी लोकांना शांततेचे आवाहन केले आहे. सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय मान्य केला पाहिजे, असे ते म्हणाले. सर्व नेते हाच संदेश देत असल्याचे ते म्हणाले.
'सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय काहीही असो. आम्ही तो स्वीकारणार आहोत. हा निकालावरून कोणाच्या हार-जितीचा काही प्रश्न नाही. उलट, यामुळे अनेक दशकांपासून सुरू असलेला हिंदू-मुस्लीम वाद संपुष्टात येईल,' असे ते म्हणाले.
राम मंदिर परिसरात मोठ्या प्रमाणात सुरक्षाव्यवस्था तैनात करण्यात आली आहे. ज्या भागात विविध धर्मांचे लोक राहतात, तेथे शांतता रहावी, यासाठी विशेष लक्ष ठेवण्यात येत आहे. तसेच, जिल्ह्यांच्या सीमांवर बॅरिकेडस लावण्यात आली आहेत. वादग्रस्त जमिनीकडे जाणारे सर्व रस्ते अतिरिक्त सैन्याची व्यवस्था करून बंद करण्यात आले आहेत.