हैदराबाद - प्रत्येक क्षेत्रात आपल्या कर्तृत्वाने वेगळी ओळख निर्माण करण्याचा मराठी माणसांचा इतिहास आहे. त्यामुळेच आपले राज्य 'महा'राष्ट्र म्हणून ओळखले जाते. त्यामध्ये आता आणखी एका मराठी अधिकाऱ्याचे नाव घ्यावे लागेल. मराठी पाऊल पडते पुढे याप्रमाणे मुळ महाराष्ट्रातील अहमदनगर जिल्ह्यातील असलेले महेश भागवत यांनी आपल्या कार्यकर्तृत्वाचा मोठा ठसा तेलंगाणा राज्यात उमटवला आहे. त्यामळे त्यांची प्रथम तेलंगाणातील रचकोंडा विभागाचे पोलीस आयुक्त म्हणून आणि आता तेलंगाणा राज्याचे 'अतिरिक्त पोलीस महासंचालक'पदी वर्णी लागली आहे.
१९९५ मध्ये भारतीय पोलीस सेवेत दाखल झालेले महेश मुरलीधर भागवत हे सध्या तेलंगाणात कार्यरत आहेत. ते मूळ अहमदनगर जिल्ह्य़ातील पाथर्डीचे आहेत. मानवी तस्करीविरोधात त्यांनी गेली १३ वर्षे काम केले असून त्याच जोडीला त्यांनी नक्षलवादाच्या प्रश्नातही चांगली कामगिरी केली आहे. अक्षरश: शेकडो लोकांना त्यांनी मानवी तस्करीच्या शापातून बाहेर काढले आहे. त्यात त्यांनी नागरी समुदाय संघटना व इतर सरकारी विभागांची मदतही घेतली. साधारणपणे प्रत्येक मोठय़ा शहरात मानवी तस्करीचे प्रकार चालतात. महिला व मुलींना विकून त्यांना वेश्या व्यवसायास लावले जाते. पण ही प्रकरणे सरधोपटपणे हाताळली जातात. भागवत यांनी ती अभिनव पद्धतीने हाताळत त्यांच्या मुळाशी जाऊन अनेक टोळ्यांची कारस्थाने उघड केली.
लॉकडाऊनच्या काळात देखील महेश भागवत यांनी अनेक गरजूंना अन्न वाटप केले. तसेच कित्येक स्थलांतरित नागरिकांना मदत केली आहे. त्यांच्या या सामाजिक कार्यासोबतच पोलीस दलाची उत्कृष्ट कार्याची दखल घेत तेलंगणा सरकारने त्यांची अतिरिक्त पोलीस महासंचालक पदी नियुक्ती केली आहे.
हेही वाचा...भारत-चीन सीमावादामुळे राम मंदिराचे भूमीपूजन लांबणीवर...