नवी दिल्ली - काँग्रेस नेते आणि देशाचे माजी अर्थमंत्री पी. चिदंबरम यांची आयएनएक्स मीडिया प्रकरणातील पुनर्विचार याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली आहे. ईडीमार्फत चिदंबरम यांना अटक करण्यात आली होती. या अटकेविरोधात चिदंबरम यांनी पुनर्विचार याचिका दाखल केली होती.
मागील वर्षी पाच सप्टेंबरला सर्वोच्च न्यायालयाने ईडीला चिदंबरम यांना अटक करुन त्यांची चौकशी करण्यास परवानगी दिली होती.
गुन्हे अन्वेषण विभागाकडून चिदंबरम यांच्यावर मे २०१७ मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर सक्त वसुली संचलनालयाकडूनही (ईडी) गुन्हा दाखल करण्यात आला. २१ ऑगस्टला त्यांना पहिल्यांदा सीबीआयकडून अटक करण्यात आली. पण, सर्वोच्च न्यायालयाने त्यांना जामीन देऊन दिलासा दिला होता. त्यानंतर ईडीकडून १६ ऑक्टोबरला अटक करण्यात आली होती. ४ डिसेंबरला त्यांना सर्वोच्च न्यायालयाकडून जामीन मिळाला होता.