अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प 24 आणि 25 फेब्रुवारी रोजी नवी दिल्ली आणि अहमदाबाद येथे भेट देणार आहेत. ट्रम्प यांचा हा पहिलाच भारत दौरा आहे. अहमदाबादपासून 13 किलोमीटर अंतरावर वसलेल्या सरदार वल्लभ भाई पटेल स्टेडियम येथे 'हाऊडी मोदी'सारख्या भव्य कार्यक्रमासाठी व्यासपीठ सज्ज झाले आहे. अमेरिकन सिनेटमधील महाभियोग आरोपांमधून निर्दोष मुक्तता झाल्यानंतर अवघ्या काही दिवसांमध्येच ते भारत दौऱ्यावर येत आहेत. अमेरिकेतील निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर, ट्रम्प यांना आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर आपल्या देशांतर्गत शक्तीचे प्रदर्शन करण्याच्या दृष्टीने हा दौरा महत्त्वाचा ठरणार आहे, असा विश्वास भारताचे अमेरिकेतील राजदूत अरुण सिंह यांनी व्यक्त केला आहे. आंतरराष्ट्रीय पत्रकार स्मिता शर्मा यांनी अरुण सिंह यांच्याशी द्विपक्षीय संबंधांची स्थिती, मर्यादित व्यापार कराराची शक्यता, काश्मीर प्रश्न आणि अमेरिका काँग्रेसमध्ये झालेल्या सीएए-एनआरसी आंदोलने आणि इतर मुद्द्यांसंदर्भात चर्चा केली आहे.
प्रश्नः2020 मध्ये होणाऱ्या अध्यक्षीय निवडणुकांपुर्वी ट्रम्प यांच्या राष्ट्राध्यक्ष पदाच्या पहिल्या कार्यकाळातील शेवटचे वर्ष आहे. ट्रम्प यांच्या भारत भेटीच्या वेळेकडे तुम्ही कसे पाहता?
उत्तर -अमेरिकन राष्ट्राध्यक्षांच्या कोणत्याही भेटीमुळे मोठ्या प्रमाणावर उत्साहपुर्ण वातावरण निर्माण होते. या भेटीसाठी अजून आठ-दहा दिवस आहेत. मात्र, याबाबत माध्यमांमध्ये चर्चा सुरु झाली आहे. लोक याबाबत बोलत आहेत. औपचारिक व्यूहात्मकता आणि राजकीयतेपलीकडे असणाऱ्या नात्याचे काहीतरी मूल्य आहे, असे यावरुन दिसून येते. कारण, यामध्ये दोन्ही देशांमधील नागरिकांची परस्पर देवाणघेवाणीचा मुद्दाही समाविष्ट आहे. आज अमेरिकेत 40 लाख भारतीय अमेरिकन, 200,000 भारतीय विद्यार्थी आहेत. त्याचप्रमाणे, अनेक भारतीय नागरिक नोकरीच्या संधींच्या शोधात अमेरिकेत जातात, किंवा भारत आणि अमेरिकेला जोडणाऱ्या नोकरीच्या संधींचा शोध घेतात. या संबंधांमध्ये लोकांच्या स्तरावर मोठ्या प्रमाणावर अपेक्षांची गुंतवणूक आहे. या सर्व बाबी विचारात घेता, केवळ बहुस्तरीय बैठकांपुरता मर्यादित न राहता नियमित द्विपक्षीय देवाणघेवाण सुरु ठेवण्यासाठी, एकमेकांच्या देशांना भेटी देत राहण्याच्यादृष्टीने हा दौरा उच्च स्तरावर महत्त्वाचा आहे. क्लिंटन यांच्यापासून प्रत्येक अमेरिकी राष्ट्राध्यक्षाने भारताला भेट दिली आहे.
प्रश्नःबराक ओबामा यांनी दोन वेळा भारताला भेट दिली.
उत्तर - ओबामा यांनी दोनदा भेट दिली आणि त्यांची पहिली भेट त्यांच्या पहिल्या कार्यकाळातील होती. जर तुम्ही क्लिंटन यांचा दौरा पाहिला, तर दुसरा कार्यकाळ संपत येत असताना त्यांनी ही भेट दिली होती. या दृष्टिकोनातून पाहिले असता, ट्रम्प आपला पहिला कार्यकाळ संपुष्टात येत असताना भारत दौऱ्यावर येत आहेत, ही महत्त्वाची बाब आहे. यावरुन ट्रम्प यांनी द्विपक्षीय संबंधांना वैयक्तिक स्तरावर महत्त्व देत असल्याचे दिसून येत आहे. हे महत्त्व केवळ भारत-अमेरिका संबंधांनाच नाही तर ट्रम्प या ब्रँडसाठी, ट्रम्प यांच्या राजकीय हितास देण्यात आलेले महत्त्व आहे.
प्रश्नः ट्रम्प यांची नुकतीच महाभियोग आरोपांमधून मुक्तता झाली आहे. ही बाब लक्षात घेता, हा दौरा म्हणजे त्यांच्यासाठीदेखील आंतरराष्ट्रीय स्तरावर आपले ब्रँडिंग करण्यासाठी, आंतरराष्ट्रीय स्तरावर देशांतर्गत विजयाचा संदेश पुढे नेण्याची संधी आहे का?
उत्तर - अगदीच. देशांतर्गत स्तरावर अमेरिकन सिनेटने 5 फेब्रुवारी रोजी त्यांची औपचारिकपणे सर्व दोषारोपांमधून मुक्तता केली आहे. त्याअगोदर, 4 फेब्रुवारी रोजी त्यांनी अमेरिकन काँग्रेसच्या दोन्ही सभागृहांना उद्देशून भाषण केले होते. त्यांच्या समर्थकांना हे भाषण आवडले होते. त्यांनी या भाषणाचा उपयोग अफ्रिकन-अमेरिकन समुदाय, हिस्पॅनिक समुदायापर्यंत पोहोचण्यासाठीदेखील केला. मात्र, देशातच नाही तर आंतरराष्ट्रीय स्तरावरदेखील त्यांचे असेच स्वागत केले जाते, असा संकेत त्यांनी देणे गरजेचे आहे. आज, जगात असे खुप कमी देश आहेत, जिथे त्यांचे अशा प्रकारचे स्वागत होऊ शकते.
प्रश्नः त्यांच्या म्हणण्यानुसार, लक्षावधी भारतीय लोक त्यांच्या स्वागतासाठी रांग लावतील?
उत्तर -हो, बरोबर आहे. भारतीय लोक त्यांचे स्वागत करण्यासाठी रस्त्यांवर येतील, अहमदाबाद येथील भव्य मैदानात गोळा होतील, दिल्लीमध्येदेखील त्यांचे राजकीयदृष्ट्या स्वागत केले जाईल. कारण इतर बर्याच देशांमध्ये, युतीबद्दल तसेच मित्रदेशांनी पुरेसे काम न करण्याविषयी त्यांनी केलेल्या वक्तव्यांबद्दल चिंता व्यक्त केली जात आहे. अफगाणिस्तानाशी संबंधित सीरियामधील काही धोरणांविषयी त्यांना चिंता आहे. द्विपक्षीय स्तरावर त्यांनी खुप काही साध्य केले आहे, हे दाखवण्यास त्यांना सक्षम व्हावयाचे आहे. काही दिवसांपुर्वी जेव्हा त्यांनी (ट्रम्प) इक्वॅ़डोरच्या राष्ट्राध्यक्षांचे स्वागत केले, तेव्हा त्यांनी म्हणून दाखवले की, या दौऱ्यावरुन असे दिसून आले की द्विपक्षीय संबंधांमध्ये त्यांनी बरीच प्रगती केली आहे. परिणामी, भारतात येणे आणि एका विशिष्ट पद्धतीने स्वागत होणे, या गोष्टी त्यांच्यासाठी फायदेशीर ठरणार आहेत.
प्रश्नःजनतेसमोर विशिष्ट पद्धतीने एखादी गोष्ट मांडण्यावर पंतप्रधान मोदी यांचा भर असतो. मात्र आशयाचा विचार करता भारत व अमेरिकेमधील व्यापारी कराराची घोषणा होईल, असे आपणांस वाटते काय?
उत्तर - आंतरराष्ट्रीय संबंधांमध्ये विशिष्ट पद्धतीने एखादी गोष्ट मांडण्यास अत्यंत महत्त्व आहे. संदेश देण्यासाठी त्याचा वापर केला जातो. मात्र आशय अर्थातच अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. ऑप्टिक्सच्या माध्यमामधून कोणतीही बाब एका विशिष्ट मर्यादेपर्यंत नेता येते. दोन्ही देश हे संरक्षणविषयक सहकार्यासंदर्भातील काही करारांस अंतिम मान्यता देण्याच्या दृष्टिकोनामधून विचार करत आहेत; यामधून या द्विपक्षीय भागीदारीच्या व्याप्तीविषयी संदेश दिला गेला आहे. या भागीदारीमध्ये दोन्ही देशांस एकमेकांविषयी वाटणारा विश्वासच यामधून ध्वनित होतो. कारण, अशा प्रकारचा विश्वास असल्याशिवाय आपण दुसऱ्या देशाकडून खरेदी करत नाही. संरक्षण क्षेत्रापलीकडे व्यापार आणि आर्थिक संबंधांची व्याप्ती आहे. भारत व अमेरिकेमधील द्विपक्षीय व्यापार आता १६० अब्ज युएस डॉलर्सपर्यंत पोहोचला असल्याचे विधान भारताच्या अमेरिकेतील राजदूताने केल्याचे माझ्या निदर्शनास आले आहे. याचाच अर्थ, हा व्यापार दिवसेंदिवस प्रभावीपणे वाढतो आहे; आणि अमेरिका हा भारताचा सर्वांत मोठा व्यापारी देश आहे. भारत हा सामान्यत: व्यापारी तुटीचा सामना करावा लागणारा देश आहे; मात्र अमेरिकेबरोबरील भारताचा व्यापार हा अधिशेष असलेला व्यापार आहे. आपल्यासाठी हे अत्यंत महत्त्वपूर्ण आहे.
मात्र यासंदर्भात काही आव्हानेही आहेत. गेल्या सप्टेंबर महिन्यापासून आपण मर्यादित व्यापार करारास अंतिम मान्यता देण्यात येणार असल्याची चर्चा ऐकत आहोत. आता फ़ेब्रुवारी महिना सुरु असून; आत्तापर्यंत ही चर्चा प्रत्यक्षात आलेली नाही. यामधून दोन्ही देशांकडून काही हितसंबंध गुंतल्याचेच दिसून येते. काहीवेळा तडजोड करणे हे सोपे नसते. मात्र या दिशेने दृढ प्रयत्न करण्यात येत आहेत. यामधून काहीतरी चांगले निघेल अशी आम्हाला आशा आहे. कारण मर्यादित करार असला तरीही ऑप्टिक्सच्या दृष्टिकोनामधून हा एक चांगला संदेश असेल.
प्रश्नःव्यापारी कराराची घोषणा न होणे निराशाजनक असेल काय? अशी घोषणा ना होणे हे काळजीचे कारण असू शकेल काय?
उत्तर - हे काळजीचे कारण असेल, असे मला वाटत नाही. हे सुलभ नाही. दोन्ही देशांकडून हितसंबंध व चिंता असल्याची बाब ध्यानी घेणे आवश्यक आहे. तेव्हा याबाबतीत अधिक काम होणे आवश्यक आहे. ऑप्टिक्ससाठी मर्यादित करार होणे चांगले असेल. मात्र, याचा राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांना अधिक फायदा होईल. भारतामधून परतून मेक्सिको, कॅनडा, दक्षिण कोरिया, चीन आणि भारताबरोबरही मी व्यापारी करार केल्याचे ते सांगू शकतील.
अमेरिकन कर्मचाऱ्यांसाठीही फायदेशीर ठरु शकणारे वेगळ्या स्वरुपाचे व्यापारी करार आपण केले असल्याचे ते अमेरिकेमधील त्यांच्या मतदारांना दाखवून देऊ शकतील. मला वाटते, भारतीय दृष्टिकोनामधून अमेरिकेबरोबरील संबंध अधिक सखोल करावयाचे असतील; तर सध्याच्या व्यापार व गुंतवणुकीच्या क्षेत्रापलीकडील नव्या क्षेत्रांचा विचारही करणे आवश्यक आहे. उदाहरणार्थ, भारत व अमेरिकेमधील उर्जाविषयक भागीदारीविषयक संधींचा विचार केला जावा, अशा आशयाचे मत भारतीय प्रतिनिधींनी व्यक्त केले आहे. किंवा सद्यस्थितीत तेल वा वायुची खरेदी अमेरिकेकडून केली जात आहे; असे याआधी आपण केले नव्हते.
नागरी उड्डाण क्षेत्राचाही विचार या पार्श्वभूमीवर केला जाणे गरजेचे आहे. कारण भविष्यात भारत अधिकाधिक विमाने खरेदी करणारा देश असेल. त्यांमधील अनेक विमाने अमेरिकेडून भारतामध्ये येतील. अशा विविध विषयांमधून व्यापारी तुटीचा विषय मार्गी लागेल. त्यापलीकडे, तंत्रज्ञानाचे प्रचंड मोठे क्षेत्र विस्तार पावत आहे. नव्या स्वरुपाचे डिजिटल तंत्रज्ञान, ५ जी, कृत्रिम बुद्धिमत्ता, क्वांटम कम्प्युटिंग, जीव शास्त्र आणि माहिती तंत्रज्ञान क्षेत्रांपलीकडील कन्व्हर्जन्स, अशी अनेक क्षेत्रे खुली होत आहेत. आपल्या ज्या पद्धतीने राहतो, आपण ज्या पद्धतीने काम करतो; या सगळ्यांत अमूलाग्र स्थित्यंतर होणार आहे. या सगळ्यामधून नव्या भागीदारी निर्माण करुन भारत व अमेरिकेमधील संबंध बदलून टाकणे महत्त्वाचे ठरणार आहे.