जून महिन्याच्या नऊ तारखेला स्वतःला कोविडमुक्त घोषित करत न्यूझीलंड जगातील नऊ कोरोनामुक्त झालेल्या देशांमध्ये सामील झाले आहे. देशात 29 मेपासून कोरोना विषाणूची कोणतीही नवी प्रकरणे आढळून आली नाहीत. हे यश आपण ‘नाचत’ साजरे केले, अशी प्रतिक्रिया न्यूझीलंडच्या तरुण पंतप्रधान जेसिंडा आर्डन यांनी दिली.
भारताचे न्यूझीलंड येथील उच्चायुक्त मुक्तेश परदेशी म्हणाले की, आरोग्य यंत्रणेकडून लवकर जारी करण्यात आलेला इशारा, स्पष्ट संदेश आणि लोकांनी पंतप्रधानांवर दाखवलेला विश्वास यातच कोविड-19 ला थोपवण्यात न्यूझीलंडला मिळालेल्या यशाचे गमक आहे. त्यांनी वरिष्ठ पत्रकार स्मिता शर्मा यांच्याशी ऑकलंड येथून संवाद साधला. यावेळी, न्यूझीलंडने आपल्या लोकांना कशाप्रकारे विषाणूची माहिती देत याविषयी शिक्षण दिले आणि परिस्थितीशी सामना करण्यासाठी कशाप्रकारे वेळेत पावले उचलली, याबाबत भारताचे राजनैतिक अधिकारी मुक्तेश परदेशी यांनी आपली निरीक्षणे नोंदवली.
आता देशांतर्गत प्रवास, सार्वजनिक कार्यक्रम आणि आर्थिक व्यवहारांवरील सर्व निर्बंध हटविण्यात आले आहेत. केवळ सीमेसंदर्भातील बंधने कायम असून, नजीकच्या काळात ऑस्ट्रेलिया किंवा लहान पॅसिफिक देशांमधील हवाई उड्डाणे पुन्हा सुरु होण्याची शक्यता आहे.
उच्चायुक्त परदेशी म्हणाले की, न्यूझीलंड हा कदाचित काही मोजक्या देशांपैकी एक किंवा एकमेव देश असेल, ज्याठिकाणी कोविडपूर्वीच्या परिस्थितीत ज्या पद्धतीने आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा झाला असता, त्याचप्रमाणे यावर्षी हा दिवस साजरा करण्यात येणार आहे.
कोविड-19 चा झालेला परिणाम आणि न्यूझीलंड आणि चीन यांच्यातील खोलवर रुजलेल्या व्यापारी संबंधांबाबत बीजिंगचा आक्रमक पवित्रा, याबाबत विचारले असता परदेशी म्हणाले की, एखाद्या देशावर अतिरिक्त प्रमाणात अवलंबून राहण्याचे तोटे न्यूझीलंडमध्ये लक्षात येत आहेत आणि कोविडनंतरच्या युगात या परिस्थितीत बदल होऊ शकेल.
संपूर्ण मुलाखत
प्रश्नःभारत आणि न्यूझीलंड यांचे आकारमान आणि लोकसंख्येत फार तफावत आहे. मात्र, न्यूझीलंडच्या कोविड-19 यशोगाथेतून शिकण्यासारखे बरेच आहे?
मी स्वतःला भाग्यवान मानतो की, मी याक्षणी न्यूझीलंडमध्ये वास्तव्यास आहे. स्वतःला कोरोना विषाणूपासून मुक्त घोषित करत देशाने आदर्श सादर केला आहे. जगातील कोविडमुक्त झालेल्या नऊ देशांमध्ये न्यूझीलंडचा 9 जून रोजी समावेश झाला. यादीत इतर देशांमध्ये युरोपातील माँटेनेग्रो आणि सामोआसारखे पॅसिफिक देश सामील आहेत. न्यूझीलंडला अशी कौतुकास्पद कामगिरी करणे शक्य झाले, कारण हा एक विकसित, उद्योगप्रधान देश असून पाश्चिमात्य चांगल्या रितीने जगाशी जोडलेला आहे. 29 मेपासून येथे कोणतीही नवी प्रकरणे आढळलेली नाहीत. यामुळे आतापर्यंत देशात 1 हजार 504 लोकांना कोरोनाची बाधा होऊन 22 जणांचे मृत्यू झाले. ही बाब मोठी दिलासादायक आहे. विषाणूला थोपवणे त्यांना शक्य झाले आहे आणि आता न्यूझीलंड आपल्या सीमेवरुन कोरोना विषाणूचे अस्तित्व पुसून टाकण्याचा प्रयत्न करीत आहे. आकारमान आणि लोकसंख्येची घनता या देशासाठी काही अनुकूल गोष्टी ठरल्या आहेत. देशाची लोकसंख्या 50 लाख आहे. मात्र, भौगोलिकदृष्ट्या हा देश बऱ्यापैकी विस्तारलेला आहे. देशभरात लोक विखुरलेले आहेत आणि येथे लोकांना एकमेकांपासून दूर किंवा विलग ठेवणे भारतासारख्या देशांच्या तुलनेने सोपे आहे.
प्रश्नः जगभरात सर्वात कडक लॉकडाऊन भारतात राबविण्यात आले होते. मात्र, तरीही प्रकरणांमध्ये एवढी तीव्र वाढ झाल्याचे दिसून आले आहे. न्यूझीलंडच्या यशोगाथेतील तुम्ही नोंदवलेले काही व्यावहारिक धडे सांगा.
त्यांच्याकडून उचलण्यात आलेले सर्वात व्यावहारिक पाऊल म्हणजे, पहिल्याच आठवड्यात विकसित करण्यात आलेली आरोग्य सूचना प्रणाली. चौथा टप्प्यात सर्वाधिक प्रमाण होते. यामुळे साधारणपणे 20 मार्च रोजी त्यांनी पहिला टप्पा घोषित केला आणि अवघ्या तीन-चार दिवसांमध्येच ते चौथ्या टप्प्यात पोहोचले. कारण, त्यांच्या असे लक्षात आले की, येथे प्रसार होऊ शकतो. सुरुवातीला बहुतांश संक्रमण हे परदेशातून विद्यार्थी, इराणमधील इतर प्रवासी आणि चीनमधून परत आलेल्या प्रवाशांमार्फत झाले. त्यांच्याकडून या देशांसाठी सीमा बंद करण्यात आली. त्याचप्रमाणे, ही चार टप्प्यांमधील आरोग्य सूचना प्रणाली राबविण्यात आली. याशिवाय, विविध टप्प्यांमध्ये काय काय घडू शकते याविषयी लोकांना सातत्याने माहिती आणि शिक्षण देण्यात आले. जेव्हा त्यांनी पहिल्या टप्प्याची घोषणा केली, तेव्हाच चौथ्या टप्प्यात काय होऊ शकते याची माहिती लोकांपर्यंत पोहोचलेली होती. परिणामी, जेव्हा पंतप्रधान आर्डन यांनी देशातील आरोग्य सूचना यंत्रणा पुढील टप्प्यात नेली. देशातील लोक आव्हान पेलण्यासाठी सज्ज झाले होते. मी असं म्हणेन की, येथील आरोग्य सूचना प्रणालीचा झालेला प्रसार म्हणजे सरकार लोकांना कशा पद्धतीने विश्वासात घेऊ शकते, याचे उत्तम उदाहरण आहे. पंतप्रधान जेसिंडा आर्डन यांना ‘हाय अप्रोव्हल रेटिंग’ आहे. लोकांनी सरकारच्या इशारा यंत्रणेस उत्तम सहकार्य केले, लोकांना प्रतिसाद दिला आणि सरकार जे करत आहे त्याविषयी त्यांनी प्रचंड विश्वास दाखवला. मी असे म्हणेन की, स्पष्ट संदेश, त्यांनी विकसित केलेली सातत्यपूर्ण आणि वेळेत राबवलेली सूचना प्रणाली न्यूझीलंडसाठी फायदेशीर ठरली.
प्रश्नः दक्षिण कोरियाने कोविडला हाताळण्याबाबत यशस्वी प्रारुप सादर केले आहे. परंतु इतर काही देशांसह हा देश दुसऱ्या संभाव्य लाटेची तयारी करत आहे. यापुढेही न्यूझीलंडकडून काय काळजी घेतली जाणार आहे?
सध्या 9 जूनपासून न्यूझीलंड आरोग्य सूचना प्रणालीच्या पहिल्या टप्प्यात आहे. परिस्थिती अद्याप पूर्णपणे सुधारलेली नाही. पण, सार्वजनिक कार्यक्रमांना परवानगी आहे. सध्या प्रवासावर कोणतीही बंधने नाहीत. अर्थव्यवस्था साधारणपणे 95 टक्क्यांपर्यंत पूर्वपदावर आली आहे. आंतरराष्ट्रीय सीमा बंद आहेत. परिणामी, पहिल्या टप्प्यामध्ये परदेशी नागरिकांना परवानगी नाही. देशात येणारे लोक हे केवळ स्वदेशी परत येण्यासाठी आयोजित विमानांमधून येत आहेत आणि ते 14 दिवसांसाठी सरकारी विलगीकरण यंत्रणेत जातात. गेल्या आठवड्यात एअर इंडियाने भारतातून प्रवासी आणले. या प्रवाशांना सरकारी विलगीकरण केंद्रांवर ठेवण्यात आले होते. त्यांनी सर्व सीमा बंद केल्या आहेत आणि त्यांचा तोच हेतू कायम राहणार आहे. पुढील पंधरा दिवस किंवा तीन आठवड्यांमध्ये नवी प्रकरणे आढळून आली नाहीत, तर असा अंदाज आहे की काही पॅसिफिक बेटे किंवा ऑस्ट्रेलियाबरोबर त्यांची सीमा खुली होऊ शकते. या देशांशी न्यूझीलंडचे घनिष्ठ संबंध आहेत. नाहीतर, एवढ्या लवकर आपल्या सीमा खुल्या करण्याचा त्यांचा विचार नाही.