नवी दिल्ली - वादग्रस्त स्वयंघोषित स्वामी नित्यानंद याच्याविरोधात आंतरराष्ट्रीय पोलीस महामंडळ, म्हणजेच 'इंटरपोल'ने 'ब्लू नोटीस' जारी केली आहे. गुजरात पोलिसांची मागणी मान्य करत त्यांनी ही नोटीस जारी केली आहे. 2010 ला दोन मुलींनी अपहरण करून अत्याचार केल्याचा आरोप त्याच्यावर केला होता. त्याप्रकरणी जामीन मंजूर झाल्यानंतर तो भारतामधून फरार झाला होता.
'ब्लू नोटीस' म्हणजे काय..?
आंतरराष्ट्रीय पोलीस महामंडळामार्फत एखाद्या प्रकरणाबाबत तपास करताना काही नोटीस जारी करण्यात येतात. यामध्ये ब्लू, ब्लॅक, यलो, पर्पल, ऑरेंज, ग्रीन आणि रेड अशा नोटिसांचा समावेश आहे. त्यामधील रेड नोटीस ही एखाद्या व्यक्तीला शोधून, त्याला ताब्यात घेऊन, त्याला शिक्षा देण्यासंदर्भात जारी करण्यात येते.
तर 'ब्लू नोटीस' ही एखाद्या व्यक्तीबाबत जादा माहिती मिळवण्यासंदर्भात जारी करण्यात येते. एखाद्या गुन्ह्यासंदर्भात एखाद्या व्यक्तीची ओळख, पत्ता, त्याच्या हालचाली या सर्व गोष्टींची माहिती मिळवण्यासाठी ही नोटीस जारी करण्यात येते.
कोण आहे स्वामी नित्यानंद..?
स्वामी नित्यानंदचे खरे नाव राजशेखरन असे आहे. मूळ तामिळनाडूचा रहिवासी असलेल्या राजशेखरनने गुजरात येथे आश्रम सुरू केला होता. याठिकाणीच मुलींचे लैंगिक शोषण, तसेच अत्याचार करून, त्याची सीडी बनवल्याचाही त्याच्यावर आरोप आहे. सध्याच्या माहितीनुसार, नित्यानंद याने गेल्यावर्षी नेपाळमार्गे भारतातून पळ काढला होता. यानंतर त्याने इक्वेडोर देशात आश्रय मिळवून तेथे स्वतःचे ‘सार्वभौम हिंदू राष्ट्र’स्थापन केले आहे, अशा बातम्या माध्यमांमध्ये प्रसिद्ध झाल्या होत्या. या देशाला त्याने 'कैलास' असे नाव दिल्याचेही समोर आले होते.
नित्यानंदाने खासगी बेटावर स्थापन केलेल्या कैलास देशाचा नेमका पत्ता माहिती नाही. मात्र, 'आपल्या देशात हिंदुत्वाचे पालन करण्याचा अधिकार बाळगणाऱ्या जगभरातील निर्वासित हिंदूंसाठी कोणत्याही सीमा नसलेले राष्ट्र' असे वर्णन या देशाच्या संकेतस्थळावर करण्यात आले आहे. तसेच या स्वतंत्र राष्ट्रात हिंदूंना मोफत अन्न, आरोग्य व शिक्षणासह इतर अनेक सुविधा देण्यात येतील, असेही जाहीर करण्यात आले आहे. या संकेतस्थळाच्या माध्यमातून नित्यानंद याने आपल्या देशाचे नागरिकत्व स्वीकारण्याचे आवाहन केले असून देश चालविण्यासाठी निधीची मागणी केली आहे.
नित्यानंद याच्या पासपोर्टची मुदत सप्टेंबर 2018 मध्येच संपली आहे, या पासपोर्टचे नूतनीकरण झालेले नव्हते. कदाचित त्याने कायद्यातून पळवाट शोधण्यासाठी बनावट पासपोर्ट आणि कागदपत्रांचा वापर केला असावा, अशी माहिती परराष्ट्र मंत्रालयाने दिली आहे.
हेही वाचा : नित्यानंद यांना आश्रय दिला नाही - इक्वाडोर