‘जागतिक लेफ्ट हँडर्स डे’ ऑगस्टच्या 13 तारखेला साजरा केला जातो. संपूर्ण जगातील बहुतेक लोक उजव्या हाताने प्रामुख्याने कामे करणारे असताना, यामध्ये अल्पसंख्य ठरलेल्या डावखुऱ्या लोकांसाठी हा दिवस साजरा केला जातो. काही व्यक्ती डावखुऱ्या असण्याचे कारण शास्त्रज्ञांना अद्याप समजलेले नाही. मात्र, आई-वडिलांपैकी एक जण डावखुरा असल्यास त्यांचे मूल डावखुरे होण्याची शक्यता निर्माण होते, ही बाब आतापर्यंत समोर आली आहे.
बहुतेक पालक त्यांच्या मुलांपैकी डाव्या हाताने स्वयंप्रेरणेने काम करणाऱ्या मुलांना उजव्या हाताने ही सर्व कामे करण्याचा आग्रह धरतात. संपूर्ण जगभरात बहुतेक लोक उजव्या हाताने काम करणारे असल्यामुळे आपल्या डावखुऱ्या मुलाला नाकारले जाण्याची भीती त्यांना वाटते. मात्र, हल्लीच्या दिवसात डावखुरे असणे ही बाबही लोकांकडून आधीच्या तुलनेत जास्त प्रमाणात स्वीकारली जात आहे.
जी लहान मुले किंवा जे लोक स्वयंप्रेरणेने एखादी वस्तू फेकताना, पकडताना, लिहिताना, काटा चमच्याचा वापर करताना डाव्या हाताचा वापर करतात, त्यांना डावखुरे म्हणून ओळखले जाते. अशा लोकांची स्वयंप्रेरणा हाताचा वापर करताना इतरांपेक्षा वेगळी असते. त्याचप्रमाणे यांचे विचार आणि काम करण्याची पद्धतही इतरांपेक्षा हटके असते, म्हटले जाते. अनेकदा डावखुऱ्या खेळाडूंना त्यांच्या या शैलीचा फायदा होताना दिसून येतो. कारण बहुतेक खेळाडू उजव्या हाताने खेळणारे असल्यामुळे त्यांना उजव्या हाताच्या स्पर्धकांशी खेळण्याची अधिक सवय असते. यामुळे डावखुऱ्या व्यक्तीशी खेळताना ते गोंधळून जातात.
'लेफ्ट हँडर्स डे' इतिहास
13 ऑगस्ट 1992 ला पहिल्यांदा आंतरराष्ट्रीय डावखुऱ्या लोकांचा क्लब तयार झाला, तेव्हापासून हा दिवस दरवर्षी साजरा केला जात आहे. डावखुऱ्या लोकांविषयी लोकांमध्ये जागृती करण्यासाठी तसेच डावखुऱ्या असण्याचे फायदे आणि तोटे लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी हा दिवस आता जगभरात साजरा केला जातो. एकट्या युकेमध्ये सध्या 20 प्रादेशिक कार्यक्रम या दिवशी मागील काही वर्षांपासून भरवले जात आहेत. यामध्ये डावखुरा विरुद्ध उजखुऱ्या लोकांचे खेळांचे सामने, डावखुऱ्या लोकांची टी-पार्टी असे अनेक कार्यक्रम घेतले जातात. याशिवाय पबमध्ये काही खेळ केवळ डाव्या हाताने खेळवले जातात. तसेच, देशभरात 'लेफ्टी झोन्स'ही तयार केले आहेत. या निमित्ताने डावखुऱ्या लोकांची सर्जनशीलता, आकलनशक्ती आणि वेगवेगळे खेळ खेळण्यातील कौशल्यांना वाव दिला जातो. तसेच येथे येणाऱ्या उजखुऱ्या लोकांनाही तेथे डावखुरे लोकांसाठी असलेल्या विविध वस्तू हाताळण्यास दिल्या जातात. यातून दैनंदिन जीवनातील उजखुऱ्या लोकांना नजरेसमोर ठेवून तयार करण्यात आलेल्या वेगवेगळ्या वस्तू हाताळण्यात डावखुर्या लोकांना किती अडचणी येतात, याची उजखुऱ्या लोकांनाही जाणीव व्हावी, हा उद्देश आहे.
सध्या जगभरातील साधारणपणे दहा टक्के जनता डावखुरी आहे. डावखुरे असण्याचे काही फायदे तर काही तोटेही आहेत.
फायदे
- डावखुरे लोक हुशार आणि बुद्धिमान असतात
- डावखुर्या लोकांना एका वेळी अनेक कामे करणे चांगले जमते.
- डावखुरे लोकांची स्मरणशक्ती चांगली असते
- बहुतेक खेळाडू उजव्या हाताने खेळणारे असल्यामुळे डावखुरे खेळाडूंना याचा फायदा मिळतो.
- डावखुरे लोक कलाकार असतात
- डावखुरे लोक टायपिंग वेगाने करतात.
डावखुरे असण्याचे तोटे
- उजव्या हाताने काम करणाऱ्या महिलांच्या तुलनेत डावखुऱ्या महिलांना स्तनांच्या कर्करोगाचा धोका अधिक असतो.
- डावखुर्या लोकांना झोपेत पाय किंवा शरीराचा भाग अयोग्य प्रकारे हलवण्याची सवय लागून त्यांच्यामध्ये दोष निर्माण होतो. उजखोरा लोकांच्या तुलनेत डावखुरा लोकांनाही समस्या भेडसावण्याची शक्यता अधिक असते.
- डावखुर्या लोकांना लहरीपणाचा विकार जडण्याची शक्यता जास्त असते. तसेच नैराश्य आणि दुभंगलेल्या मानसिकतेची शक्यताही अधिक असते.
- 2011 मध्ये ब्रिटिश टेशन ऑफ हेल्थ सायकॉलॉजी मधील एका अभ्यासात डावखुरा लोकांना उजखोरा लोकांपेक्षा दारूचे व्यसन अधिक प्रमाणात असल्याची बाब समोर आली होती.
हे आहेत जगप्रसिद्ध डावखुरे लोक
लिओनार्दो दा विंची
लिओनार्दो दा विंची हा प्रसिद्ध डावखुऱ्या कलाकारांपैकी एक आहे. विज्ञान संग्रहालयाच्या मते, दा विंची हे आपल्या ‘मिरर रायटिंग’साठी (दर्पण लेखन) परिचित होते. एका प्रकारच्या सांकेतिक लिपीत त्यांनी आपला मजकूर उलट बाजूने लिहिला होता. त्यांना डावखुरे असल्यामुळे कदाचित शाईने डावीकडून उजवीकडे लिहिणे अधिक सोपे गेले असेल, असा तर्क लावला जातो.
महात्मा गांधी
भारत ब्रिटिशांच्या गुलामगिरीतून मुक्त होण्यास काराणीभूत ठरलेले आणि जगाने महात्मा म्हणून स्वीकारलेले गांधीजी डावखुरे होते. त्यांनी आपल्या डाव्या हातातील काठीने देशाला स्वातंत्र्याकडे नेले. त्यामुळे आपण भारतीय असल्याचा अभिमान बाळगत असू तर, डावखुऱ्या लोकांना अभिमान बाळगण्यासाठी आणखी एक कारण मिळेल.
मदर टेरेसा
रोमन कॅथलिक नन मदर टेरेसा बर्याच गोष्टींसाठी परिचित आहेत. त्यातील एक म्हणजे त्या डावखुऱ्या होत्या. कागदपत्रांवर सही करण्याच्या निमित्ताने काढल्या गेलेल्या अनेक छायाचित्रांमध्ये त्या डाव्या हाताचा वापर करताना दिसून येतात.