नवी दिल्ली - दिल्ली उच्च न्यायालयाने ऑगस्टा वेस्टलँड घोटाळ्याप्रकरणी आरोपी क्रिश्चियन मिशेलचा अंतिम जामीन अर्ज फेटाळला आहे. न्यायाधिश मुक्ता गुप्ता यांनी मिशेलचा अंतीम जामीन अर्ज फेटाळण्याचे आदेश आहे. कोरोनामुळे कैद्यांना पॅरोलवर सोडण्यात येत आहे. मात्र, या कैद्यांना सोडण्यासाठी काही मानक ठरवण्यात आले आहे.
उच्च न्यायालयाने म्हटले, की सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर उच्चस्तरीय समितीने कैद्यांना सोडण्यासाठी तीन मानक ठरवले आहे. यानुसार विदेशी नागरिक, एक किंवा त्यापेक्षा जास्त प्रकरणांमध्ये एकदाही जामीन मिळाला नसेल, तसेच भ्रष्टाचार विरोधी कायदा आणि पैशांच्या गैरव्यवहाराप्रकरणी तुरुंगात कैद असलेल्या कैद्यांना न सोडण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. क्रिश्चियन मिशेल या तिन्ही प्रकारांमध्ये येत असल्याने त्यांना जामीन दिला जाणार नाही. मिशेलला कोरोनाचा धोका नाही, असेही न्यायालयाने स्पष्ट केले. सीबीआयने मिशेलच्या अंतीम जामिनाला विरोध करत त्याला वेगळ्या सेलमध्ये ठेवले आहे. या सेलमध्ये असलेल्या इतर कैद्यांना कोरोनाचे संक्रमण नसल्याने मिशेलला धोका नाही, असे सांगण्यात आले.