विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम हे अतिमहत्त्वाच्या खटल्यांसाठी परिचीत आहेत. देशभरातील अनेक महत्त्वाचे खटले त्यांनी लढवले आहेत. वकिली क्षेत्रातील एक मोठं आणि आदराचे व्यक्तिमत्त्व म्हणून उज्ज्वल निकम यांच्याकडे पाहिले जाते. तहव्वूर हुसैन राणाला अटक केल्यानंतर निकम यांनी ईटीव्ही भारतशी संवाद साधला.
राणाविरोधातील आपल्या प्रयत्नांना प्राथमिक यश आले आहे. राणाचा २६/११ हल्ल्यात सहभाग होता. एका बॉम्बस्फोटात राणाची शाळा उद्धवस्त झाली होती. याचा त्याच्या मनात मनस्वी राग होता. यानंतर तो भारतविरुद्ध कारवाया करू लागल्या. अमेरिकेत राणाची आणि डेव्हिड हेडलीची गाठ पडली. राणा अमेरिकेत इमिग्रेशन लॉ सेंटर चालवत होता. याचे कार्यालय मुंबईत सुरू करून त्याची जबाबदारी हेडलीकडे सोपवली. या कार्यालयाच्या कामाच्या बहाणा करून हेडली मुंबईत आला आणि त्याने सर्व परिसराची रेकी केली. हुसैन राणाने हेडलीला सर्व प्रकारची मदत केली, अशी माहिती उज्ज्वल निकम यांनी दिली. गुन्हेगार हस्तांतरणाची प्रक्रिया सुरू झाली असून हे भारताच्या दृष्टीने मोठे यश असल्याचेही निकम म्हणाले.
राणाला भारतात आणण्यासाठी किती वेळ लागेल याबाबत सध्या निश्चित काही सांगता येणार नाही. कायद्याची प्रक्रिया किचकट असते. ट्रम्प प्रशासन यासंदर्भात भारताला सकारात्मक मदत करेल, अशी आशा असल्याचेही निकम यांनी सांगितले. मी मुंबईतील न्यायालयात डेव्हिड हेडलीची साक्ष घेतली होती. यावेळी हेडलीने राणाचा मुंबईवरील हल्ल्यात कसा सहभाग आहे, हे सविस्तर कबूल केले होते, अशी माहिती निकम यांनी दिली.
राणाच्या विरुद्ध आपल्याकडे पुरावे आहेत. त्याने मुंबईत इमिग्रेशन लॉ सेंटर सुरू केले होते. मात्र, या सेंटरमधून कोणालाही इमिग्रेशन दिले गेले नव्हते. राणाने खोट्या नावाखाली सेंटर उघडून मुंबई हल्ल्यातील दहशतवाद्यांना मदत केली असल्याचा पुरावा भारताकडे असल्याचे निकम यांनी सांगितले.