लॉकडाऊनचा मोठ्या प्रमाणात फटका उद्योगांना बसला. मात्र अल-अदिल कंपनीवर याचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव झाला नसल्याचे संचालक धनंजय दातार यांनी सांगितले. आमच्याकडे सर्व कच्च्या मालाचा वर्षभर पुरेल इतका साठा होता, असे ते म्हणाले. याची शिकवण १९९०च्या आखाती देशांमधील युद्धावेळी घेतली. त्यावेळी महामारीसारखीच परिस्थिती होती. भारतातून कच्चा माल येत होता. मात्र आखाती देशांतील लोकांमध्ये भीतीचे वातावरण होते. अनेक लोक पळून गेले. त्याचवेळी भविष्यात येणाऱ्या नैसर्गिक संकटांसाठी मानसिक तयारी केल्याचे ते म्हणाले. त्यानुसार संकटकाळाच्या दृष्टीने आर्थिक तरतूद, मजुरांची कमी आणि पुरवठा साखळीत अडथळे येणार नाहीत, याची काळजी घ्यायला सुरुवात केली. यानंतर काही वर्षांनी सुरतमध्ये प्लेग सुरू झाला होता. त्यातून देखील आम्ही बाहेर पडलो. आत्ता महामारीच्या वेळी देखील याचाच फायदा झाला. भारतात दुकानांमध्ये माल कमी पडत असताना देखील आखाती देशांमध्ये त्याची कमी भासली नाही. याचे श्रेय व्यवस्थापनाला देतो, असे दातार म्हणाले.
सध्या सर्वत्र ऑनलाइन खरेदीत वाढ झाली आहे. याबाबत विचारल्यानंतर, आमची ऑनलाइन विक्री एवढी वाढली, की त्यामुळे अनेकदा वेबसाइटच क्रॅश झाली, असे दातार यांनी सांगितले. लोक ऑनलाइन मागणी वाढवण्याची अपेक्षा करत होते. घाबरून दुकानात न जाता लोकांनी ऑनलाइन खरेदीला प्राधान्य दिल्याचे त्यांनी म्हटले.