बंगळुरू - कोरोना विषाणूने जगभर थैमान घातले असून हजारो लोकांचा यामुळे जीव गेला आहे. भारतामध्ये कोरोना विषाणूचे संक्रमण थांबवण्यासाठी येत्या १४ एप्रिल पर्यंत देश बंद करण्यात आला असून लोकांना घरामध्येच थांबण्याचे सांगण्यात आले आहे. मात्र, बंगळुरुमधील इन्फोसिसच्या एका कर्मचार्याने लोकांना कोरोना विषाणूचे संक्रमण पसरवण्यास उद्युक्त केले होते. त्याप्रकरणी शहरातील सिटी क्राइम ब्रँचने त्याला अटक केली आहे.
मुजीब मोहम्मद असे त्या व्यक्तीचे नाव आहे. मुजीबने फेसबूक पोस्टच्या माध्यमातून लोकांना घराबाहेर पडण्यास उद्युक्त केले होते. 'चला हात मिळवूया, घरा बाहेर पडून कोरोना विषाणू पसरवूया', या आशयाची त्याने पोस्ट लिहली होती. याप्रकरणी त्याला पोलिसांनी अटक केली असून गुन्हा दाखल केला आहे. बंगळुरुमधील इन्फोसिस सॉफ्टवेअर कंपनीमध्ये काम करत असल्याची माहिती सहआयुक्त संदीप पाटील यांनी दिली.