नवी दिल्ली - भारताने कोरोनाच्या रुग्णांवर उपचार करण्यासाठी हायड्रोक्सिक्लोरोक्वीन डोसची मदत अमेरिकेला केल्यामुळे अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी कृतज्ञता व्यक्त केली. त्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रिटि्वट केले. 'कठीण काळातच मैत्री ही घट्ट होते. या संकटात भारत-अमेरिका संबंध अधिक मजबूत झाले आहेत', असे मोदींनी टि्वट केले आहे.
'मी आपल्याशी पूर्णपणे सहमत आहे. कठीण काळातच मैत्री ही घट्ट होते. भारत-अमेरिका भागीदारी पूर्वीपेक्षा अधिक मजबूत झाली आहे. कोरोनाविरोधातील लढ्यात भारत सर्वतोपरी प्रयत्न करेल. आपण ही लढाई मिळून जिंकू', असे टि्वट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले.
बुधवारी डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा एकदा नरेंद्र मोदींचं कौतुक करणार त्यांचे आभार मानले. 'कठीण काळात मित्रांकडून जास्तीत मदतीची गरज असते. हायड्रोक्सीक्लोरोक्वाईन संबंधी घेतलेल्या निर्णयाबद्दल भारत आणि भारतीय लोकांचे आभार. ही मदत कधीच विसरली जाणार नाही', असे डोनाल्ड ट्रम्प ट्विट करत म्हटले होते.
हायड्रोक्सिक्लोरोक्वीन हे औषध कोरोनाच्या उपायासाठी परिणामकारक सिद्ध ठरत आहे. अनेक रुग्णांवर त्याचा चांगला परिणाम दिसून आला आहे. मलेरियासाठी वापरले जाणारे हायड्रोक्सिक्लोरोक्वीन हे औषध कोरोनाच्या रुग्णांसाठीही गुणकारी असल्याचे काही चाचण्यांमध्ये निष्पन्न झाले आहे. त्यानंतर अमेरिकेने या औषधाची भारताकडे मागणी केली होती.