नवी दिल्ली - कोरोना विषाणूचा भारतातील प्रसार दिवसेंदिवस वाढत चालला आहे. आरोग्य मंत्रालयाच्या अद्ययावत आकडेवारीनुसार, मागील 24 देशभरात 1 हजार 429 कोरोनाग्रस्त आढळून आले आहेत. तर 57 जणांचा मृत्यू झाला आहे. महाराष्ट्र, तामिळनाडू, गुजरात आणि दिल्लीमध्ये कोरोनाचे सर्वात जास्त रुग्ण आढळून आले आहेत.
देशातील एकूण कोरोनाग्रस्तांचा आकडा 24 हजार 506 झाला आहे, यात 18 हजार 668 अॅक्टिव्ह केस आहेत, अशी माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली आहे. तर 5 हजार 63 जण पूर्णत: बरे झाले आहेत. तसेच 775 जणांचा मृत्यू झाल्याची माहितीही आरोग्य मंत्रालयाने दिली आहे.
महाराष्ट्रामध्ये 6 हजार 817 कोरोनाबाधित असून 301 जणांचा मृत्यू झाला आहे. तामिळनाडूमध्ये 1 हजार 755 कोरोनाबाधित असून 22 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. गुजरातमध्ये 2 हजार 815 कोरोनाबाधित असून 127 जणांचा मृत्यू झाला आहे. तसेच दिल्लीमध्ये 2 हजार 514 कोरोनाबाधित तर 53 जणांचा मृत्यू झाला आहे. यापाठोपाठ राजस्थानमध्येही 2 हजार 34 कोरोनाबाधित आढळले असून 27 जणांचा मृत्यू झाला आहे.
देशातील कोरोना रुग्ण बरे होण्याचा दर वाढून 20.57 टक्के झाला आहे. मागील 28 दिवसांत 15 जिल्ह्यात एकही नवा कोरोनाचा रुग्ण आढळून आला नाही. तर 80 जिल्ह्यामध्ये मागील 14 दिवसांत एकही नवी केस समोर आली नाही अशी माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली आहे.
कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासन, प्रशासन, पोलीस आणि आरोग्य विभाग युद्ध पातळीवर प्रयत्न करत आहे. अनेक नागरिकही आपापल्यापरिने या कामासाठी मदत करत आहेत. तसेच या महामारीचा सामना करताना केंद्र सरकारवरील आर्थिक ताण दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे केंद्र सरकारने खर्चांमध्ये कपात करण्यास सुरुवात केली आहे. त्यानुसार सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता जुलै 2021 पर्यंत न वाढविण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे.
दरम्यान जगभरामध्ये कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 28 लाख 30 हजार 82 वर पोहोचली आहे. तर 1 लाख 97 हजार 246 जणांचा मृत्यू झाला आहे. यात दिलासादायक बाब म्हणजे, 7लाख 98 हजार 776 लोक उपचारानंतर बरे झाले आहेत. ब्रिटनमध्ये गेल्या 24 तासांमध्ये 616 जणांचा मृत्यू झाला आहे. तर अमेरिकेत कोरोना संकट दिवसेंदिवस गंभीर होत चालले आहे.