नवी दिल्ली :गेल्या २४ तासांमध्ये नोंद झालेल्या ६० हजार ९६३ नव्या कोरोना रुग्णांच्या नोंदीनंतर, देशातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या २३ लाखांच्या पुढे गेली आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने याबाबत माहिती दिली.
यासोबतच, गेल्या २४ तासांमध्ये नोंद झालेल्या ८३४ कोरोना मृत्यूंमुळे, देशातील कोरोनाच्या एकूण बळींची संख्या ४६ हजार ९१वर पोहोचली आहे.
देशात सध्या २३ लाख २९ हजार ६३८ कोरोना रुग्ण असून, त्यांपैकी ६ लाख ४३ हजार ९४८ रुग्णांवर उपचार सुरू आहे. तर, १६ लाख ३९ हजार ५९९ रुग्णांवर यशस्वी उपचार करण्यात आले आहेत.
भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेने दिलेल्या माहितीनुसार, आजपर्यंत एका दिवसातील सर्वाधिक कोरोना चाचण्या या ११ ऑगस्टला करण्यात आल्या होत्या. मंगळवारी ७ लाख ३३ हजार ४३९ कोरोना चाचण्या करण्यात आल्या होत्या. तर, देशात कोरोनाचा प्रसार झाल्यापासून आतापर्यंत एकूण २ कोटी ६० लाख कोरोना चाचण्या करण्यात आल्या आहेत.