नवी दिल्ली -देशात कोरोनाच्या रुग्ण संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. आतापर्यंत 97 लाख 35 हजार 850 कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. मात्र, यातच दिलासादायक बाब म्हणजे रिकव्हरी रेटमध्येही वाढ झाली आहे. कोरोना रुग्णांचा रिकव्हरी रेट 94.66 टक्के झाला आहे. तर मृत्यूचा दर 1.45 टक्के आहे.
मंगळवारी 32 हजार 80 नव्या रुग्णांची भर पडली असून 402 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे एकूण 1 लाख 41 हजार 360 रुग्णांचा बळी गेला आहे. तर 3 लाख 78 हजार 909 कोरोना रुग्णांवर देशातील विविध रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
कोरोना रुग्णांनी 7 ऑगस्टला 20 लाख, 23 ऑगस्टला 30 लाख, 5 सप्टेंबरला 40 लाख, 16 सप्टेंबरला 50 लाख, 28 सप्टेंबरला 60 लाख, 11 ऑक्टोंबरला 70 लाख, 29 ऑक्टोबरला 80 लाख आणि 20 नोव्हेंबरला 90 लाखाचा टप्पा पार केला.
महाराष्ट्रात सर्वांत जास्त मृत्यू -
याचबरोबर मंगळवारी दिवसभरात 10 लाख 22 हजार 712 कोरोना चाचण्या घेण्यात आल्या. तर आतापर्यंत एकूण 14 कोटी 98 लाख 36 हजार 767 कोरोना चाचण्या पार पडल्या आहेत. तर काल दिवसभरात दिल्लीमध्ये 57, महाराष्ट्रात 53, पश्चिम बंगालमध्ये 49, केरळमध्ये 31, पंजबामध्ये 30, उत्तर प्रदेशमध्ये 23 आणि राजस्थानमध्ये 20 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे. आतापर्यंत सर्वांत जास्त 47 हजार 827 मृत्यू महाराष्ट्रात झाले आहेत. त्यापाठोपाठ कर्नाटक, तामिळनाडू, दिल्ली, पश्चिम बंगाल आणि उत्तर प्रदेशमध्ये मृत्यू दर जास्त आहे.
64 देशांचे राजदूत आज हैदराबाद दौऱ्यावर -
भारतामध्ये होत असलेल्या कोरोना लस निर्मितीवर जगाचे लक्ष लागले आहे. आज बुधवारी जगभरातील 64 देशांचे राजदूत आणि प्रतिनिधी हैदराबादच्या दौऱ्यावर आहेत. आज हे मंडळ भारत बायोटेक आणि बायोलॉजिकल ई लिमिटेड म्हणजे बीई कंपन्यांचा दौरा करणार आहेत. भारत बायोटेकने कोरोनावर 'कोव्हॅक्सिन' निर्माण केली आहे. कोरोनाविरोधात लढण्यासाठी जगाच्या प्रयत्नात भारत मोलाचे योगदान देत असल्याचे एका अधिकाऱ्याने सांगितले.
हेही वाचा -मोठी बातमी! तीन कोरोना लसींना लवकरच परवाना मिळणार