नवी दिल्ली - भारताने जर हायड्रोक्सिक्लोरोक्वाईन औषधाच्या निर्यातीवरील बंदी उठवली नाही, तर आम्ही भारताचा सूड घेऊ, अशी धमकी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दिली आहे. ट्रम्प यांच्या या वक्तव्यावरून टीका करण्यात येत आहे. काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्यानंतर आता पक्षाचे नेते शशी थरूर आणि जयवीर शेरगिल यांनीही ट्रम्प यांच्यावर टीका केली आहे.
दरम्यान, हायड्रोक्सिक्लोरोक्वाईन हे औषध कोरोनाच्या उपायासाठी परिणामकारक ठरत आहे. अनेक रुग्णांवर त्याचा चांगला परिणाम दिसून आला आहे.
जागतिक कार्यकाळातील माझ्या दशकांच्या अनुभवात मी कधीही राष्ट्रप्रमुख किंवा सरकारला अशाप्रकारे दुसर्याला धमकी देताना ऐकले नाही. हायड्रोक्सिक्लोरोक्वाईन हे औषध विकायचे, की नाही हा भारताचा निर्णय आहे, असे काँग्रेसचे नेते व माजी केंद्रीय मंत्री शशी थरूर म्हणाले.
भारत अनेक वर्षांपासून अमेरिकेसोबतच्या व्यापाराचा फायदा घेत आहे' अशी टीका ट्रम्प यांनी केली. पुढे भारताने हा पुरवठा न केल्यास भारताचा सूड घेऊ, अशी भाषाही त्यांनी केली. यातून ट्रम्प आणि अमेरिकेचा भारताकडे पाहण्याचा दृष्टीकोन स्पष्ट होतो. अमेरिका भारताकडे केवळ देवघेवीच्या व्यापारी नजरेतून पाहते. "हाऊडी मोदी" किंवा "नमस्ते ट्रम्प" या कार्यक्रमातून भारत हा अमेरिकेचा कोणत्याही परिस्थितीत मित्र देश असल्याचा संदेश देण्यात आला होता. मात्र, अमेरिकेच्या या पवित्र्यावरून तसे दिसत नाही, असा जोरदार टोला काँग्रेस प्रवक्ते जयवीर शेरगिल यांनी लगावला.