वायनाड - काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर हल्लाबोल केला आहे. 'देशाची परिस्थिती काय आहे. हे पूर्ण जगाला माहिती आहे. मात्र, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरुद्ध बोलल्यास किंवा त्यांना प्रश्न विचारल्यास संबधीत व्यक्तीला तुरुंगात टाकल्या जाते, असे राहुल गांधी म्हणाले.
अर्थव्यवस्था ही भारताची सर्वात मोठी ताकद आहे. मात्र, मोदींनी देशाची अर्थव्यवस्था पुर्णपणे बिघडवली आहे. देशात मोठ्या प्रमाणात बेरोजगारी वाढली आहे. याचे उत्तर त्यांनी द्यायला हवे, असे राहुल गांधी यांनी म्हटले.
केरळ आणि कर्नाटकला जोडणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग ७६६ वर वाहतूक बंदी विरोधात तरुण उपोषण करत आहेत. त्यांची राहुल गांधी यांनी भेट घेतली. हा कायदेशीर मुद्दा असून यावर न्यायालयामध्ये सुनावणी सुरू आहे. यासंबधी आम्ही कायदा तज्ञांशी सल्लामसलत केली असून त्यांना हस्तक्षेप करण्याची विनंती केली आहे, असे राहुल गांधी तरुणांशी बोलताना म्हणाले.
काय आहे प्रकरण?
राष्ट्रीय महामार्ग एनएच-७६६ चे ३४.६ इतके क्षेत्र बांदीपूर आणि वायनाडमधील राष्ट्रीय उद्यानामधून जातो. प्राण्यांना वाहनांच्या आवाजापासून वाचवण्यासाठी २००९ मध्ये म्हैसूरच्या उपायुक्तांनी वाहनांना बंदी घातली होती. ही बंदी रात्री ९ वाजल्यापासून ते सकाळी ६ वाजेपर्यंत असते. या निर्णयाला कर्नाटक न्यायालयामध्ये आव्हान देण्यात आले होते. मात्र, न्यायालयाने निर्णय कायम ठेवला होता. याप्रकरणी सर्वोच्च न्यायालय सुनावणी करत आहे.