नवी दिल्ली - भारतीय राज्यघटना अंमलात आल्याचा दिवस म्हणून, आपण दरवर्षी प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा करतो. यावर्षीच्या प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून 'ईटीव्ही भारत'ने संविधान विशेषज्ञ सी. कश्यप यांची विशेष मुलाखत घेतली आहे.
कश्यप हे सातव्या, आठव्या आणि नवव्या लोकसभा सत्रांचे सरचिटणीस राहिले आहेत. त्यांच्याशी आपण भारताच्या संविधानाबाबत चर्चा केली. यावेळी त्यांनी आपले संविधान हे कसे बाकी देशांच्या राज्यघटनेहून वेगळे आहे, आणि त्याचे वैशिष्ट्य काय आहे याबाबत त्यांनी आपले मत व्यक्त केले.
या मुलाखतीतील काही ठळक मुद्दे..
प्रश्न : भारतीय राज्यघटना अंमलात येऊन आता ७० वर्षे पूर्ण होत आहेत. संविधान लागू झाल्यानंतरचा भारताचा बराचसा प्रवास आपणही पाहिला आहे, काय सांगाल या एकूण प्रवासाविषयी?
कश्यप : आपले संविधान ही केवळ विशेष नाही, तर अगदी अद्वितीय अशी राज्यघटना आहे. आपल्या देशातील काही महान विचारांच्या लोकांनी एकत्र येऊन, आपल्या देशाचे भविष्य आणि आकांक्षांचा विचार करून तयार करण्यात आलेली ही एक उत्कृष्ट राज्यघटना आहे. या घटनेच्या निर्मात्यांमध्ये देशातील नेते, देशभक्त आणि विद्वानांचा सहभाग होता. त्यांच्या मेहनतीमुळेच अवघ्या तीन वर्षांच्या काळात, ही घटना लिहून पूर्ण झाली. आपली राज्यघटना ही बदलत्या काळाचा विचार करून बनवण्यात आली होती. त्यामुळेच दुसऱ्या महायुद्धानंतर जेव्हा कितीतरी देशातील राज्यघटना रद्द करण्यात आल्या, किंवा बदलण्यात आल्या, तेव्हा भारताची राज्यघटना बदलावी लागली नाही. लोकांमध्ये असलेल्या घटनेबाबतच्या अशिक्षिततेमुळे आपल्या घटनेतील बऱ्याच महत्त्वाच्या गोष्टींकडे लोकांचे दुर्लक्ष होते. आपण सर्व घटनेचा आधार घेत आपल्या हक्कांबाबत आवाज उठवतो. मात्र, त्याचवेळी आपल्या कर्तव्यांकडे आपण पाठ फिरवतो.
प्रश्न : गेल्या ७० वर्षांच्या काळात राज्यघटनेमध्ये बऱ्याच सुधारणा करण्यात आल्या. या वेळोवेळी झालेल्या सुधारणा कितपत महत्त्वाच्या होत्या?
कश्यप -एक आदर्श राज्यघटना ही लवचिक आणि काळानुरूप बदलता येणारी असावी. त्यामध्ये काळानुरूप काही गोष्टींचा पुनर्विचार करण्याची, सुधारणा करण्याची आणि बदलही करण्याची सोय असायला हवी. भारताची राज्यघटना ही अशीच आहे. १९५० पासून आतापर्यंत या घटनेमध्ये १०३ वेळा सुधारणा करण्यात आली आहे. काही महिन्यांपासून चर्चेत असलेल्या कलम ३७० बाबत बोलायचे झाल्यास, त्यासाठी घटनेमध्ये सुधारणा करण्याची गरज नव्हती. कारण, या कलमामध्येच ते रद्द करण्याची तरतूद आहे. मात्र, आपण ते कलम रद्द केले नाही, तर त्यामध्ये सुधारणा केली आहे.
प्रश्न : सध्या नागरिकत्व सुधारणा कायद्यावरून देशभरात आंदोलने सुरू आहेत. विरोधी पक्ष सरकारवर टीका करत आहेत, की हे सरकार मनमानी निर्णय घेत संविधानामध्ये हवा तसा बदल करत आहेत. त्यामुळे, संविधान धोक्यात आल्याचे मत देशभरात तयार होत आहे, याबाबत काय सांगाल?