नवी दिल्ली - देशभरामध्ये कोरोनाचे १६९ रुग्ण आढळून आले आहे. कोरोनाच्या भीतीमुळे देशभरातीतल जनजीवन विस्कळीत झाले आहे. कमी प्रवासी संख्येमुळे रेल्वे विभागाने देशभरातील तब्बल १६८ गाड्या रद्द केल्या आहेत. उन्हाळ्याच्या सुट्टयांमध्ये रेल्वेगाड्या पूर्ण क्षमतेने भरलेल्या असतात. मात्र, आता कोरोनाच्या भीतामुळे प्रवाशांनी आरक्षित केलेले तिकिटे रद्द करण्यास सुरूवात केली आहे.
कोरोनाच्या भीतीने रेल्वेला लागला ब्रेक; देशभरातील १६८ गाड्या रद्द - कोरोना विषाणू
कमी प्रवासी संख्येमुळे रेल्वे विभागाने देशभरातील १६८ गाड्या रद्द केल्या आहेत.
आरोग्याची काळजी घेण्याबरोबरच अनावश्यक प्रवास टाळण्याचा सल्ला आरोग्य विभागाने दिला आहे. दिवसेंदिवस कोरोनाचे रुग्ण देशात वाढतच आहेत. त्यामुळे नागरिक प्रवास टाळत असल्याचे दिसून येत आहे. याचा फटका रेल्वेच्या उत्पन्नालाही बसणार आहे.
उन्हाळ्याच्या सुट्टयांमध्ये जवळजवळ महिनाभर आधीची रेल्वे तिकिटे आरक्षित असतात. मात्र, कोरोना संसर्गाच्या भीतीने नागरिक प्रवास टाळत आहेत. रेल्वे विभागाने कोरोनाचा बिमोड करण्यासाठी गाड्यांमध्ये स्वच्छता ठेवण्यावर भर दिला आहे. रेल्वे डब्यांचे सतत निर्जंतुकीकरण करण्यात येत आहे. तर बहुतांश गाड्यांच्या वातानुकूलीत डब्यांमध्ये उश्या आणि पांघरूणे देण्यासही रेल्वेने बंद केले आहे.