नवी दिल्ली : भारत-श्रीलंकेच्या नौदलामध्ये आठवी वार्षिक लष्करी कवायत पार पडणार आहे. 'SLINEX-20' नावाने ही कवायत श्रीलंकेतील त्रिनकोमाली येथे १९ ते २१ ऑक्टोबरदरम्यान होणार आहे.
या कवायतीसाठी श्रीलंकेच्या नौदलाकडून सायुरा आणि गजबाहू या युद्धनौका सहभागी होणार आहेत. श्रीलंकेच्या नौदलाच्या तुकडीचे नेतृत्त रेअर अॅडमिरल बंदारा जयतिलक हे करणार आहेत. तर, भारताकडून स्वदेशी बनावटीच्या कामोर्ता आणि किल्टन या युद्धनौका सहभागी होणार असून, नौदलाच्या तुकडीचे नेतृत्व रेअर अॅडमिरल संजय वात्स्यायन करणार आहेत. युद्धनौकांसोबतच भारतीय नौदलातील अॅडव्हान्स्ड लाइट हेलिकॉप्टर (एएलएच), चेतक हेलिकॉप्टर आणि डोर्निअर मॅरिटाईम पेट्रोल एअरक्राफ्टही या सरावात सहभागी असणार आहे. यापूर्वी २०१९साली सप्टेंबरमध्ये विशाखापट्टणम येथे भारत-श्रीलंकेच्या लष्करादरम्यान वार्षिक कवायत पार पडली होती.